मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले उद्धव व राज ठाकरे बंधू आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढविणार का, याबाबत अद्याप स्पष्टता काही नसली तरी ‘बेस्ट’ पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीच्या पॅनेलचा धुव्वा उडाल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात काही चांगली झालेली नाही.

बेस्ट पतपेढीचे सुमारे १५ हजार एवढेच मतदार होते. म्हणजेच छोट्या महानगरपालिकांमध्येही यापेक्षा अधिक मतदार असलेला एक प्रभाग असतो. यामुळे बेस्ट पतपेढीच्या निकालाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीशी संबंध जोडणे तसे चुकीचेच. पण सुमारे १८ वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने त्याची चर्चा जास्त झाली होती.

दोन्ही पक्षांच्या संयुक्त पॅनेलमुळे हवा तयार झाली होती. पण २१ पैकी एकही जागा मनसे व शिवसेनेच्या संयुक्त पॅनेलला मिळू शकली नाही. यातूनच ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम जाणवला नाही. अशी खोचक टीका भाजपचे मुख्य प्र‌वक्ते केशव उपाध्ये यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, अशी वातावरणनिर्मिती भाजपने सुरु केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रभागांमधील मतदारांची संख्या किमान ५० हजार असते. बेस्ट पतपेढीचे १५ हजार मतदार असताना महानगरपालिका निवडणुकीशी त्याची तुलना करणे खरे तर चुकीचेच. पण शिवसेना, मनसे एकत्र आल्याने फरक पडत नाही, या भाजपने निर्माण केलेल्या वातावरणाचा लोकांवर नक्कीच परिणाम होतो.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतदारांवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकेल. सध्या कबुतरखाने बंद करण्यावरून मुंबईत मराठी लोकांमध्ये वेगळी भावना निर्माण झाली आहे. जैन समाजाच्या मुनींकडून शस्त्रे हाती घेण्याची देण्यात येणारी धमकी, दादरच्या कबुतरखान्यासमोर जैन समाजाच्या लोकांनी घातलेला धिंगाणा, भाजपकडून जैन समाजाला चुचकारण्यात येत असल्याची निर्माण झालेली भावना यातून मराठी लोकांमध्ये नक्कीच संतप्त प्रतिक्रिया आहे.

१९८५ पासून मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा मुद्दा चर्चेत येतो. १९८५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई तोडण्याच्या आरोपांवर केलेल्या विधानाचा शिवसेनेला फायदा झाला होता. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा प्रचारात येतो. सध्या ज्या प्रकारे जैन समाजाच्या आक्रमकपणासमोर फडणवीस सरकारने नांगी टाकली त्यावरून मराठी मतदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे. ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आल्यास मराठी मतदारांची एकजूट या युतीला फायदेशीर ठरू शकते. त्याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. यामुळेच बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना-मनसेच्या संयुक्त पॅनेलचा पराभव झाल्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही, अशी टीका भाजप, शिंदे गटाने सुरू केली आहे.