मुंबई : विधानसभा निवडणूक रणधुमाळीनंतर आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदुत्वा’चा नारा दिला आहे. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा, असे आदेश ठाकरे यांनी आयोजित बैठकीत दिले.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मुंबई महापालिका निवडणूक कधीही लागू शकते त्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याची सूचना ठाकरे यांनी केली. यावेळी ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. निवडणुकीच्या काळात भाजपकडून संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्यात आली.

हेही वाचा >>> ‘अदानी’वरून काँग्रेसला चपराक; तृणमूल, सपच्या दबावामुळे राहुल गांधींची माघार

शिवसेना (ठाकरे) हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार करण्यात आला. महापालिका निवडणुकांतही विरोधकांकडून हा अपप्रचार केला जाण्याची शक्यता असून, त्याला योग्य पद्धतीने खोडून काढा. शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. हिंदुत्वासाठी लढत राहणार, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

स्वबळावर लढण्याची चाचपणी

● शिवसेना ठाकरे गट लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावणार आहे. मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर घेणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघातील २२७ प्रभागात तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● तयारीसाठी नेते, सचिव आणि संघटकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांसह एकूण १८ पदाधिकारी दोन विधानसभेतील १२ प्रभागांचा आढावा घेणार आहेत. पुढील आठवडाभरात अहवाल तयार करून उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे.