Upendra Kushwaha is Unhappy as NDA Seat Sharing : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सूत्रावर राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आक्षेप घेतला आहे. भाजपाच्या धोरणावर असंतोष व्यक्त करीत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रियादेखील थांबवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाल्याशिवाय राष्ट्रीय लोक समता पक्षाचा एकही उमेदवार नामांकन अर्ज भरणार नसल्याचे कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे. नेमकी काय आहेत त्यांच्या नाराजीची कारणे, त्याबाबत जाणून घेऊ..
एनडीएचे जागावाटपाचे सूत्र काय?
बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रविवारी जागावाटपाचे सूत्र जाहीर केले आहे. त्यातील २९ जागा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत; तर भाजपा आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. एनडीएमधील इतर मित्रपक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाला प्रत्येकी सहा जागांवरच समाधान मानावे लागले आहे. जागावाटपाच्या या सूत्रावर राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपाच्या गोटात उडाली खळबळ
मंगळवारी उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या उमेदवारांना नामांकन अर्ज भरण्यापासून रोखल्यामुळे भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. कुशवाह यांच्या पाटणा येथील निवासस्थानाला मंगळवारी छावणीचे स्वरूप आले होते. भाजपाचे अनेक दिग्गज नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत होते. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि मंत्री नितीन नवीन यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुशवाह यांच्याबरोबर बैठका घेतल्या. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
अनेक नेत्यांकडून कुशवाह यांची मनधरणी
मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर उपेंद्र कुशवाह यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सर्वकाही ठीक नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. बुधवारी राष्ट्रीय लोक समता पक्षातील नेत्यांची पाटण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र, ही बैठकही कुशवाह यांनी रद्द केली असून ते थेट दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राजधानीत गेल्यानंतर ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन जागावाटपाच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.
कुशवाह यांच्या नाराजीचे नेमके कारण काय?
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जागावाटपातील सूत्रांनुसार उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला सहा जागा देण्यात आल्या आहेत. आग्रही मागणी करूनही कमी जागा मिळाल्याने आणि पसंतीच्या जागांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कुशवाह हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. महुआ आणि दिनारा विधानसभा मतदारसंघावरून त्यांची प्रमुख नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हा मतदारसंघ लोक जनशक्ती पार्टीला देण्यात आल्याने त्यांची तीव्र नाराजी आहे. कुशवाह यांना याच मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायची आहे. मंगळवारी भाजपाच्या नेत्यांनी समजूत घालण्याचे प्रयत्न करूनही कुशवाह आपल्या भूमिकेवर ठाम होते. सम्राट चौधरी आणि नित्यानंद राय यांनी केलेल्या सूचना त्यांनी नाकारल्याचे समजते. पहाटे ५ वाजेपर्यंत या वादावर तोडगा न निघाल्याने ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत फूट पडणार?
कुशवाह यांच्या या भूमिकेमुळे बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची निवडणूक तयारी आणि एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अमित शाह यांनी मध्यस्ती करण्याची तयारी दर्शवल्यानंतर कुशवाह हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नित्यानंद राय हेदेखील असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला कुशवाह महुआ जागेच्या दाव्यावर ठाम आहेत; तर दुसऱ्या बाजूला लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही ही जागा सोडण्यास नकार दिला आहे, त्यामुळे मध्यस्थी करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Chirag Paswan : चिराग पासवान यांनी जागावाटपात कशी मारली बाजी? भाजपाने कशामुळे त्यांना दिलं झुकतं माप?
अमित शाह यांनी काय आदेश दिले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी चिराग पासवान यांना महुआ जागेचा निर्णय तात्पुरता थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा चिराग पासवान यांनी त्यांच्या चार उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु, महुआ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार संजय सिंह यांची उमेदवारी त्यांनी थांबवली आहे. चिराग पासवान सध्या दिल्लीत असून, उर्वरित जागांबद्दल त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, भाजपाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उर्वरित ३० जागांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
एनडीएमध्ये सकारात्मक तोडगा निघणार का?
बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. एनडीएने रविवारी जाहीर केलेल्या अधिकृत जागावाटप सूत्रांनुसार, भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) २९ जागा, तर उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांच्या पक्षाला प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. जागावाटपाच्या सूत्रावरून उपेंद्र कुशवाह नाराज असल्याने भाजपाचे केंद्रीय नेतृत्व त्याबाबत सकारात्मक तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.