चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘कुणबी कार्ड’ खेळले आहे. वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा या तीन मतदारसंघांत भाजपने, तर काँग्रेसने राजुरा व वरोरा या दोन मतदारसंघांत कुणबी जातीचे उमेदवार दिले आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात भाजपने प्रथमच हिंदू दलित तर काँग्रेसने बौद्ध समाजाचा उमेदवार दिला आहे. माळी, तेली व मुस्लीम समाजाची दोन्ही पक्षांनी उपेक्षा केल्याचे बोलले जात आहे. तसेच महिलांनाही दोन्ही पक्षांनी संधी नाकारली आहे.

जिल्ह्यात कुणबी मतदारांची संख्या इतरांच्या तुलनेत अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयात या समाजाची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीत ‘कुणबी कार्ड’ खेळले. भाजपने वरोरा येथून करण देवतळे, राजुऱ्यात देवराव भोंगळे व ब्रम्हपुरीत कृष्णा सहारे हे तीन कुणबी उमेदवार दिले आहे. काँग्रेसने राजुरा येथून आमदार सुभाष धोटे व वरोरा येथून प्रवीण काकडे हे दोन कुणबी चेहरे दिले आहेत.

हेही वाचा – रायगडमध्ये काँग्रेसचे ठाकूर यांची पुन्हा बंडखोरी

भाजपने बौद्ध समाजातील उमेदवाराला डावलल्याची भावना आहे. २००९ ते २०१९ यादरम्यानच्या तीन निवडणुकीत भाजपने नाना शामकुळेंच्या रुपात बौद्ध समाजाचा चेहरा दिला होता. त्यामुळेच भाजपला कधी नव्हे ते या समाजाने मतदान केले. मात्र, आता भाजपने अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिल्याने बौद्ध समाज भाजपवर नाराज असल्याचे बोलले जाते. काँग्रेसने बौद्ध समाजाचे प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी देत मागील दोन निवडणुकांमध्ये झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – जरांगेची मतपेढी अपक्षांच्या पाठीशी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस व भाजपने ब्रम्हपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व बल्लारपुरातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन अल्पसंख्याक नेत्यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, भाजप व काँग्रेसने अनुक्रमे चिमूर येथून आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया आणि बल्लारपुरातून संतोषसिंह रावत या दोन हिंदी भाषिकांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने चिमूर येथून सतिश वारजूकर हा संख्येने अल्पसंख्याक असलेल्या समाजाचा उमेदवार दिला आहे. राजकीय आणि जातीय समीकरण साधताना भाजप व काँग्रेसने जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या तेली, माळी, मुस्लीम समाजाला स्थान दिले नाही. भाजपने चंद्रपूरमधून बौद्ध समाजाचा उमेदवार दिला नाही व नाराजी ओढवून घेतली, तर तेली समाजाचा उमेदवार द्यावा म्हणून प्रकाश देवतळे यांनी लोकसभा निवडणुकीत इशारा दिला होता. मात्र, आता जिल्ह्यात भाजपकडून एकही तेली उमेदवार नाही. तरीही देवतळे निमुटपणे शांत का आहेत, असा प्रश्नही चर्चिला जात आहे.