नवी दिल्ली : ‘तुमच्या बोलण्याचा सूर योग्य नाही’, असा आक्षेप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी शुक्रवार राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर घेतला. त्यांच्या या विधानामुळे संतापलेले धनखड आणि जया बच्चन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ‘तुमचे बोलणे मी खपवून घेणार नाही’, असे धनखड यांनी ठणकावले. मात्र, धनखडांच्या जया बच्चन यांच्याविरोधातील भूमिकेमुळे संपूर्ण विरोधीपक्ष बच्चन यांच्या पाठीशी उभा राहिला व धनखडांचा निषेध करत त्यांनी सभात्याग केला.

हेही वाचा >>> कारण राजकारण : कोल्हापूरच्या चंद्रकांतदादांना कोथरूड पुन्हा मानवेल?

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व भाजपचे घन:श्याम तिवारी यांच्यामध्ये मतभेद झाले होते. तिवारी यांच्या टिप्पणीवर खरगेंनी नाराजी व्यक्त केली होती. विरोधी खासदारांनी तिवारींच्या माफीची मागणी केली होती. हा मुद्दा काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सभागृहात उपस्थित केला. या मुद्द्यावर धनखड यांनी जया बच्चन यांना बोलण्याची परवानगी दिली. या विषयावर बोलणाऱ्या ‘जया अमिताभ बच्चन’ या अखेरच्या सदस्य असतील असे धनखड म्हणाले. या विधानावरून जया बच्चन संतप्त झाल्या व तुमचा सूर योग्य नाही, असे त्या धनखडांना म्हणाल्या. याआधीही जया बच्चन यांनी त्यांच्या उल्लेखावर नाराजी व्यक्त केली होती. पण, शुक्रवारी धनखडांनी पुन्हा तसाच उल्लेख केल्यानंतर राज्यसभेत मानापमान नाट्याचा प्रयोग झाला!

‘मी कलाकार आहे आणि समोरच्याची शारीरभाषा आणि चेहऱ्यावरील भाव मला समजतात. पण, तुमच्या बोलण्यातील सूर योग्य नव्हता. आपण सगळे सहकारी आहोत, पण, तुमचा सूर मला मान्य नाही’, असे जया बच्चन म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर धनखडांनी तीव्र आक्षेप नोंदवत, ‘तुम्ही तुमच्या कामातून प्रतिष्ठा मिळवली आहे. पण दिग्दर्शकावर कलाकाराचे काम अवलंबून असते. इथे दररोज मला उपदेश द्यायला लावू नका. तुम्ही माझ्या सुराबद्दल बोलता? तुमचे म्हणणे मी खपवून घेणार नाही. तुम्ही कोणी प्रतिष्ठित असाल पण, सभागृहातील शिष्टाचार तुम्हाला पाळावा लागेल. तुम्ही सेलिब्रिटी असाल पण इथे शिष्टाचार पाळा’, असे धनखड म्हणाले. धनखडांच्या ‘सेलिब्रिटी’ या शब्दावर विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. ‘जया बच्चन या राज्यसभेच्या सदस्य आहेत’, असे तृणमूल काँग्रेसच्या सदस्य सुष्मिता देव म्हणाल्या. त्यावरही धनखड यांनी, ‘सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांना संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा आणि सभापतीच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा परवाना मिळाला आहे का’, असा सवाल केला. त्यानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. विरोधकांच्या या कृतीवर, ‘विरोधकांना सभागृहात फक्त गोंधळ निर्माण करता येतो’, अशी टिप्पणी धनखड यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माफी मागण्याचा मुद्दा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला रंगलेल्या या नाट्यामध्ये सत्ताधारी भाजप व ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेतेही सामील झाले. त्यांनी विरोधकांच्या सभात्यागाचा निषेध केला व निंदाप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी, ‘देशाची आणि सभागृहाची विरोधकांनी माफी मागितली पाहिजे’, असा मुद्दा मांडला. नड्डांच्या मागणीचे ‘एनडीए’तील अन्य नेत्यांनीही समर्थन केले.