वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत त्रांगडे उद्भवले असून उमेदवार आहे तर चिन्ह नाही आणि चिन्ह आहे तर उमेदवार नाही, अशी स्थिती दिसून येते.

निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली होती तेव्हा, महाविकास आघाडीच्या गोटात नीरव शांतताच होती. पुढे काँग्रेसची ही पारंपरिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गेल्याचे कळताच ही शांतता भंग पावली. पाठोपाठ या पक्षातर्फे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचे नाव आले आणि चाचपणी दौरेही सुरू झाले. तरीही ही जागा काँग्रेसने सोडू नये म्हणून जिल्ह्यातील एकाही ज्येष्ठ नेत्याने सूर काढला नाही. शेवटी पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेत काँग्रेसची इभ्रत राखण्यासाठी पाऊल टाकले. प्रदेश नेत्यांना साकडे घातले. मात्र, निरुत्साह दिसून आल्याचे ते सांगतात. एकट्याचे बळ कमी पडते म्हणून त्यांनी चारुलता टोकस, अमर काळे, शेखर शेंडे, नरेश ठाकरे यांना सोबत घेत मुंबई-दिल्लीवाऱ्या केल्या. तेव्हा कुठे वर्धेची जागा काँग्रेससाठीच राखू, असे आश्वासन प्रदेश नेत्यांनी दिले.

हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

काळे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार झाले, ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सेवाग्राम-पवनार ही राजकीय तीर्थक्षेत्रे असलेला मतदारसंघ काँग्रेस कधीच सोडणार नाही, असा दुर्दम्य विश्वास सर्वत्र व्यक्त होत होता. पण त्या विश्वासाला काँग्रेसच्या नेत्यांनीच तडा दिल्याचे दिसून आले. शेवटच्या टप्प्यात काँग्रेस उमेदवारालाच लढवा, असा निकराचा लढा सुरू झाला, तेव्हा काळे यांना शरद पवार भेटीची सूचना झाली. मात्र, पवार यांनी मतदारसंघ सोडण्याचे सपशेल नाकारत ‘तुतारी’ चिन्हावरच लढण्याचे काळेंना सूचविले.

हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

हेही वाचा – मी १०० टक्के निवडणुकीच्या रिंगणात, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत – वसंत मोरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीतर्फे हर्षवर्धन देशमुख यांच्यानंतर समीर देशमुख, राजू तिमांडे, कराळे गुरुजी, किशाेर कन्हेरे हे प्रयत्नशील आहेत. पक्षाने निवडणुकीसाठी पैसे देणार नाही, असे स्पष्ट केल्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी पैसा हा मोठा निकष ठरला. त्यामुळे बहुतांश इच्छुकांची घालमेल सुरू झाली. त्यामुळे या पक्षाकडे चिन्ह आहे पण तगडा उमेदवार नाही तर काँग्रेसकडे तगडा उमेदवार आहे पण जागा सोडल्याने चिन्ह नाही. नव्या चिन्हावर लढायचे कसे? हा महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना पडलेला प्रश्न. काळे हे पवारांची ‘ऑफर’ स्वीकारून प्रथमच पंजाचा त्याग करणार का, हा लाखमोलाचा अनुत्तरीत प्रश्न. पंजाशिवाय लढण्यास ते तयार झाले नाही तर राष्ट्रवादीच्या कोणत्या इच्छुकाची ‘लॉटरी’ लागणार हे पुढेच समजणार.