पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपावर मात केली आहे. या निवडणुकीत सर्व जिल्हा परिषदा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर साधारण ९२ टक्के पंचायत समित्यांवर तृणमूल काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. या निवडणकुकीत तृणमूल काँग्रेसची कामगिरी नेमकी कशी राहिली? भाजपाला किती जागा मिळाल्या? काँग्रेसची स्थिती काय आहे? हे जाणून घेऊ या….

९२ टक्के पंचायत समित्या तृणमूलच्या ताब्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारली आहे. या निवडणुकीत तृणमूलने ८० टक्के ग्राम पंचायतीत विजय मिळवला आहे. येथे ग्रामपंचायतीच्या एकूण ३३१७ जागांवर निवडणूक झाली होती. यातील साधारण २६४१ जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. तर ९२ टक्के पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस पक्षच वरचढ ठरला आहे. पंचायत समितीच्या ३४१ जागांपैकी जवळजवळ ३१३ जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर तृणमूलचाच झेंडा फडकला आहे.

कालिम्पॉंग, दार्जिलिंगमध्ये तृणमूलला खाते उघडता आले नाही

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा ते उत्तरेकडील कूचबिहारपर्यंत अशा जवळजवळ सर्वच प्रदेशांत तृणमूल काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. मात्र कालिम्पॉंग आणि दार्जिलिंग या दोन पर्वतीय जिल्ह्यांत तृणमूल काँग्रेसला खाते उघडता आलेले नाही. मात्र या भागात तृणमूल काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा या पक्षाने कालिम्पॉंग जिल्ह्यातील ४२ पैकी ३० जागांवर तसेच दार्जिलिंग जिल्ह्यातील ७० जागांपैकी ३८ जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी हा विजय लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

जिल्हा परिषदेच्या ८८० जागांवर तृणमूलचा विजय

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपाचा ७७ जागांवर विजय झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा एकूण ९२८ जागांपैकी ८८० जागांवर विजय झाला. भाजपाला फक्त सात जागांवर विजय मिळवता आला. तर काँग्रेस १३ आणि डाव्या पक्षांना फक्त २ जागांवर विजय मिळवता आला.

११ पंचायत समितींमध्ये त्रिशंकू स्थिती

तृणमूल काँग्रेसने ३१३ पंचायत समितींत विजय मिळवला आहे. तर भाजपाला फक्त सात पंचायत समितींवर सत्ता स्थापन करता आली. नऊ पंचायत समितींवर अन्य पक्ष तसेच अपक्षांनी बाजी मारली. तर ११ पंचायत समितींमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

२६४१ ग्रामपंचायतींवर तृणमूल काँग्रेसने फडकवला झेंडा

ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालाचा विचार करायचा झाल्यास एकूण ३३१७ पैकी २६४१ ग्रामपंचायतींवर तृणमूल काँग्रेसने आपला झेंडा फकडवला आहे. भाजपाला २३० ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. काँग्रेसने ११ तर डाव्या पक्षांनी ९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. २६७ ग्रामपंचायतींत कोणत्याही एका पक्षाचा स्पष्ट विजय झालेला नाही. अपक्षांनी १४९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तृणमूलची बाजी

मालदा हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र या भागात १४६ पैकी ५९ ग्रामपंचायतींवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. तर ६४ ग्रामपंचायतींवर कोणत्याही एका पक्षाचा विजय होऊ शकला नाही. या ग्रामपंचायतींत त्रिशंकू स्थिती राहिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुवेंदू अधिकारी यांच्या जिल्ह्यात भाजपाची चांगली कामगिरी

पूर्वा मेदिनापूर जिल्ह्यात भाजपाने तुलनेने चांगली कामगिरी केली. या भागातील एकूण २२३ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली. भाजपाचे बडे नेते सुवेंदू अधिकारी हे याच जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे अधिकारी यांनी या भागात भाजपाने चांगली कामगिरी करावी, यासाठी पूर्ण जोर लावला होता. शेजारच्या नादिया जिल्ह्यात भाजपाने १८५ पैकी ४४ ग्रामपंचायतींवर सत्ता आणण्यात यश मिळवले.