पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या अॅड. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी यांनी त्यांचा बालपणीचा मित्र प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केले.
खेवलकर आणि खडसे ही दोनही कुटुंब सध्या जळगावातील मुक्ताईनगर इथे राहतात. प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. खेवलकर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय बांधकाम क्षेत्र, इव्हेंट मॅनेजमेंटचा आहे. तसंच खेवलकर साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.
खेवलकर यांची समर प्रॉडक्शन नावाची कंपनीदेखील आहे. वाढत्या डिजिटल लँडस्केपचा फायदा घेत ओटीटी क्षेत्रात प्रवेश करण्याचाही त्यांचा मानस होता.
प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांचे पती प्रांजल हे राजकारणापासून लांबच आहेत. प्रांजल यांची एक ट्रॅव्हल कंपनीदेखील असल्याची माहिती समोर आली आहे.
हडपसरच्या बंगल्यावर टाकला आहे छापा
खराडी इथल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावरही छापा टाकला आहे. सध्या तिथे कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झडती घेतली जात आहे.
खेवलकर यांची लिमोझन गाडी ठरली होती वादग्रस्त
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे याआधीही एका कारणाने चर्चेत आले आहेत. खेवलकर यांच्या सोनाटा लिमोझिन या आलिशान गाडीच्या संदर्भात ते वादात सापडले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रांजल यांच्या लिमोझिन कारच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत या गाडीची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप केला होता. प्रांजल खेवलकर यांची एमएच १९ एक्यू ७८०० ही सोनाटा लिमोझिन कार बेकायदेशीर असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. या गाडीची नोंदणी जळगाव आरटीओमध्ये झाली होती तसंच गाडीला पासिंगही मिळाले होते. मात्र या गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. छोट्या वाहनांच्या श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. तसंच अॅम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त इतर लिमोझिन गाड्यांना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता.
दरम्यान, रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात नेण्यात आलं. एकनाथ खडसे यांचे जावई रंगेहाथ पकडले गेल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावरही छापा टाकण्यात आल्याने नेमके हे प्रकरण कसे उघडकीस आले याबाबतही चर्चा सध्या सुरू आहे.