सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसबा विधानसभा मतदार संघ हा भाजपचा हक्काचा मतदार संघ असून, भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदार संघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची राजकीय परंपरा अनेक पक्षांकडून जपली जाते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याची भूमिका जाहीर केली असून, अन्य विरोधी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली असताना भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टिळक कुटुंबांतील व्यक्तीला की खासदार गिरीश बापट यांच्या कुटंबातील एकाला संधी मिळणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे.

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदार संघातील पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे– पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांची कानउघाडणी करत या मतदार संघात निवडणूक न लढविता अशा प्रसंगी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा… भाजप नेत्यांच्या खेळीने मुंडे भगिनी अस्वस्थ

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा सुमारे २८ हजार मतांनी पराभव झाला होता. आता शिंदे हे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष आहेत. त्यांच्यापुढे पद टिकवून शहराध्यक्ष होण्याचे पक्षांतर्गत आव्हान असताना त्यांच्याकडून पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

दोन्ही काँग्रेस पोटनिवडणूक लढविण्यास इच्छूक नसताना अन्य पक्षांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेची या मतदार संघात ताकद नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा… पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदल मोहिमेत धुसफूस

या मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत सर्वांचे लक्ष असणार आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपमधून करण्यात येत आहे. भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी टिळक कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचाही आग्रह भाजपच्या एका गोटातून करण्यात येत आहे. बापट यांचा पुत्र गौरव किंवा बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचे नाव चर्चेत आहे. स्वरदा यांना राजकारणाला अनुभव आहे. त्या भाजपच्या सांगलीतील नेत्या नीता केळकर यांच्या कन्या आहेत. विवाहापूर्वी त्या सांगलीमध्ये नगरसेविका होत्या. तसेच त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. भाजपकडून टिळक किंवा बापट यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे.

हेही वाचा… नगरच्या नामांतरावरून भाजप खासदाराचा स्वपक्षीय आमदारालाच घरचा आहेर

विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदार संघात भाजपकडून माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे इच्छुक उमेदवार होते.

१९९५ पासून भाजपचा बालेकिल्ला

कसबा मतदार संघ १९६२ पासून आहे. सुरुवातीला या मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व होते. १९६२ मध्ये पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे निवडणूक आले. १९८० मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदार संघात विजय मिळविला. अरविंदे लेले हे त्यावेळी भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर १९९५ पर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस राहिली आहे. १९८५ मध्ये काँग्रेसकडून उल्हास काळोखे हे निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये दिवंगत खासदार अण्णा जोशी यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसला यश मिळाले होते. मात्र, १९९५ मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून गिरीश बापट हे निवडून आले. त्यानंतर सलग पाचवेळा त्यांनी या मतदार संघातून प्रतिनिधित्त्व केले आहे. ते खासदार झाल्याने २०१९ मध्ये मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आणि टिळक निवडून आल्या. त्यामुळे हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the bjps next candidate from kasba peth assembly constituency print politics news asj
First published on: 03-01-2023 at 09:54 IST