Bihar Assembly elections 2025 : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेले भाष्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रीय लोकशाहीला पुन्हा सत्ता मिळाल्यास पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अमित शाहांनी सूचक विधान केले आहे. आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निकालानंतर एनडीएचे आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांची निवड करणार असल्याचे सांगितले आहे. बिहारची निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जात असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला आहे.
साधारणत: विधानसभा निवडणुकीआधी विविध राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जातात. बिहारच्या निवडणुकीआधी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांच्या महाआघाडीने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलेला नाही. त्यातच अमित शाह यांनी मुख्यमंत्री निवडण्यासाठी आमदारांच्या बैठकीचा उल्लेख केल्यामुळे नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
मध्य प्रदेशात काय घडले होते?
अमित शाह यांनी केलेल्या विधानाला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्याची पार्श्वभूमी आहे. ही नाट्ये पाहता बिहारमध्येही मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अनपेक्षितपणे बदलला जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये भाजपाने मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यांच्या जागी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मोहन यादव यांची निवड केली. या निर्णयाची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगली होती. त्यावेळी चौहान यांच्या काही समर्थकांनी भाजपावर उघडपणे टीकाही केल्याचे पाहायला मिळाले होते.
आणखी वाचा : निवडणूक बिहारची, पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची; कारण काय? कन्हैया कुमार यांनी काय सांगितलं?
महाराष्ट्रातही राबवला होता मध्य प्रदेश पॅटर्न
२०२४ मध्येही भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न राबवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यानंतर महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. मात्र, त्यानंतर शिंदेंच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. भाजपाच्या या निर्णयामुळे शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सरतेशेवटी त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्रिपदाची सूत्रे जाण्याला कारणीभूत महायुतीचे संख्याबळ ठरल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातो. भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास महायुतीला शिंदे यांच्याशिवायही सरकार स्थापन करता येत होते, त्यामुळे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे शिंदेंना नमते घ्यावे लागले.
अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
अमित शाह यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत २०२० च्या विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली. गेल्या निवडणुकीत भाजपाने ७४ तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेडला ४३ जागा मिळाल्या होत्या. तरीही भाजपाने मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांनाच दिले. यंदाच्या निवडणुकीत मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आमदारच घेतील, असा सूचक इशारा अमित शाह यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. भाजपाने या निवडणुकीत जनता दल युनायटेडला अधिक जागा सोडण्यास नकार दिला होता. शेवटी जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवण्यावर सहमती दर्शवली. यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत भाजपाने ११० जागा; तर जेडीयूने ११५ जागांवर उमेदवार उभे केले होते, एनडीएमध्ये नितीश कुमार यांचेच पारडे जड असल्याची भावना निर्माण झाली होती.
भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार का?
२०२० च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाचा विजयी स्ट्राइक रेट जेडीयूपेक्षा जास्त राहण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हनुमान’ म्हणवणाऱ्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी गेल्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून जेडीयूचे तब्बल २८ जागांवर नुकसान केले होते. यावेळी प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष हीच भूमिका बजावू शकतो, असा अंदाज विश्लेषकांनी बांधला आहे. २०१४ नंतर भाजपाने हिंदी भाषिक राज्यांमध्ये चांगले बस्तान बसविले आहे. मात्र, बिहारमध्ये त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास सातत्याने अपयश आले आहे. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांना पलटू राम म्हणून हिणवले जाते. त्यामागचे कारण म्हणजे त्यांनी अनेकदा आपली राजकीय भूमिका बदललेली आहे.
नितीश कुमार भाजपाच्या छायेतून बाहेर पडणार?
२०१३ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाबरोबरची युती तोडली होती. २०२५ मध्ये त्यांनी महाआघाडीत सामील होऊन मुख्यमंत्रिपद उपभोगले. २०१७ मध्ये नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतले. २०२२ मध्ये भाजपाशी दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांनी महाआघाडीशी पुन्हा हातमिळवणी केली. २०२४ मध्ये त्यांनी भाजपाबरोबर पुन्हा सरकार स्थापन केले. वारंवार भूमिका बदलूनही नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद टिकून ठेवले. निवडणुकीत जेडीयूला बहुमत मिळाले नाही तरी त्यांच्याशिवाय राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू शकत नाही, अशी प्रतिमा बिहारमध्ये तयार झाली. गेल्या तीन दशकांपासून नितीश कुमार यांनी राज्याच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी ते भाजपाच्या छायेतून कधीही बाहेर पडू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा : MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या मनसेपासून काँग्रेस का ठेवतेय दुरावा? कारण काय?
नितीश-लालूंमध्ये होती घनिष्ठ मैत्री
१९८० च्या दशकात नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दिल्लीतील फिरोजशाह रोडवरील शरद यादव यांच्या निवास्थानी दोघेही तासनतास वेळ घालवत असत. मुख्यमंत्रिपदाच्या संधीची ते आतुरतेने वाट बघत होते. अखेरीस १९९० मध्ये लालू प्रसाद यादव पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. या दोन्ही नेत्यांनी तीन दशकांहून अधिक काळ राज्यातील राजकारण गाजवले. लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीने ओबीसी वर्गाला सामाजिक बळ दिलं; तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासन आणि सुशासन पद्धतीला अधिकच बळकटी दिली. सध्याच्या घडीला तेजस्वी यादव, प्रशांत किशोर आणि सम्राट चौधरी हे तिन्ही नेते मुख्यमंत्रिपदासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहेत, तर नितीश कुमार सहजपणे माघार न घेता आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नितीश कुमार पुन्हा महाघाडीत जाणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. शिवाय यादव आणि इतर मागासवर्गीय समुदायाला आकर्षित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्ता मिळाल्यास भाजपा नितीश कुमार यांना हटवून आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करेल का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कठीण राजकीय परिस्थिती हाताळण्यात भाजपाला अत्यंत पटाईत मानले जाते. नितीश कुमार यांच्या अनेक निकटवर्तीयांना पक्षाने आपल्या बाजूने वळवले आहे. मात्र, नितीश कुमार यांची आतापर्यंतची राजकीय भूमिका पाहता भाजपाने त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर भाजपाने नितीश यांना मुख्यमंत्रिपद देण्यास टाळाटाळ केल्यास ते पुन्हा महाघाडीत जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.