काँग्रेस हा कुटुंबाकडून चालविणारा पक्ष असल्याचे विधान काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांनी केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान बनण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी (दि. १६ ऑक्टोबर) केरळमधील तिरुवनंतपुरम येथे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली संघटनेच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत असताना थरूर यांनी काँग्रेस आणि भारतीय राजकारणावर अनेक विधाने केली आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत खरगे यांच्यासह शशी थरूरही निवडणुकीला उभे होते, मात्र मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.

.. तर देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळेल

तिरुवनंतपुरम येथे थरूर यांनी केलेल्या वक्तव्यावर पीटीआयने सविस्तर वृत्त दिले आहे. “आगामी निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीचा विजय होऊ शकतो. ही आघाडी कोणत्याही एका पक्षाची नसल्यामुळे सर्व पक्ष मिळून एका नेत्याला पंतप्रधानपदासाठी निवडू शकतात. पण माझा अंदाज आहे, पंतप्रधान काँग्रेस पक्षातून होईल. एकतर विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान होऊ शकतात. यानिमित्ताने भारताला पहिला दलित पंतप्रधान मिळू शकतो. तसेच काँग्रेस हा अनेक अर्थाने एका कुटुंबाकडून चालविणारा पक्ष असल्यामुळे कदाचित राहुल गांधीही पंतप्रधान होण्याची शक्यता आहे”, अशी भूमिका थरूर यांनी व्यक्त केली.

हे वाचा >> मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायलची चिंता -राहुल गांधी

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शशी थरूर पुढे म्हणाले, “पंतप्रधान कुणीही झाले तरी संसदीय व्यवस्थेत पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो आणि इतर मंत्र्यांवरदेखील महत्त्वाच्या जबाबदारी असतात. माझ्यावर कोणतीही जबाबदारी टाकली तरी मला आत्मविश्वास आहे की, ती मी पूर्ण करू शकेन” तसेच भारतातील राजकीय व्यवस्थेत, एखाद्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये पाहून पद दिले जात नाही, तर त्या व्यक्तिची निवड करत असताना इतर बाबींचाही विचार केला जातो.

भारतात ओबामा यांच्यासारखी कारकिर्द घडू शकत नाही

“आपली संसदीय व्यवस्था अमेरिकेच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. आपल्या संसदीय व्यवस्थेत पक्ष ठरवतो की, कुणाकडे नेतृत्व द्यायचे. कुणी निवडणूक लढवावी हे भारतात राजकीय पक्ष ठरवितात. तर अमेरिकेमध्ये मतदारच त्यांचा लोकप्रतिनिधी ठरवितात. भारतात ओबामा यांच्यासारखी राजकीय कारकिर्द घडविणे अवघड आहे. आपला देश खूप मोठा आहे. इथे लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत. यामुळेच इथे वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांना फारसे महत्त्व नाही”, असे शशी थरूर बोलल्याचे एएनआयने आपल्या बातमीत म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी मंगळवारी मिझोराम येथे पत्रकार परिषद घेतली असता त्यांना घराणेशाहीवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गांधी यांनी अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांच्याकडे बोट दाखविले आणि स्वतःला या प्रश्नापासून वेगळे केले. राहुल गांधी उत्तर देताना म्हटले की, अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंह यांचा मुलगा काय करतो? मी ऐकले की, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेटची धुरा सांभाळत आहे. भाजपामधील अनेक नेत्यांचे मुले सार्वजनिक जीवनात आहेत. अनुराग ठाकूरही घराणेशाहीतूनच पुढे आलेले आहेत.

कुटुंबाकडून चालविले जाणाऱ्या पक्षांवर मोदींचे टीकास्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी तेलंगणा राज्यात जाहीर सभा घेऊन विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. यावेळी त्यांनी तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसवर टीकास्र सोडले. ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष दोन कुटुंबाकडून चालविले जातात. दोघांचीही ओळख भ्रष्टाचारी आणि कमिशन घेणारे अशी झाली आहे, ज्यामुळे राज्याचा विकास मागच्या काही दिवसांपासून रोखला गेला आहे.

हे वाचा >> गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश; हिंदुत्ववाद्यांशी पंगा घेणाऱ्या महुआ मोईत्रा कोण आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी पुढे म्हणाले, “दोन्ही पक्षांचा एकच फॉर्म्युला आहे. “कुटुंबाने, कुटुंबासाठी, कुटुंबाकडून चालविलेला पक्ष म्हणून यांच्या पक्षाची ओळख आहे. या लोकांनी लोकशाहीला घराणेशाहीमध्ये रुपांतरीत केले आहे. त्यांचा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा कारभार करतो. पक्षाचा अध्यक्ष, सीईओ, संचालक, खजिनदार, व्यवस्थापकीय संचालक आणि प्रबंधक एकाच पक्षातून निवडले जातात.”