Next Vice President candidates जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे. सोमवारी उशिरा रात्री आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का बसला आहे.
धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे कारण दिले असले, तरी विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत आणि या निर्णयाला आगामी निवडणुकांशी जोडतानादेखील दिसत आहेत. धनखड यांच्या निर्णयानंतर, सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात भारताचे पुढील उपराष्ट्रपती कोण होऊ शकतील, याबद्दल अनेक नावांची चर्चा सुरू आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस खासदार शशी थरूर अशा अनेक नावांचा समावेश आहे. पुढील उपराष्ट्रपती कोण होणार? त्यासाठी कोणती नावे आघाडीवर आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात.

नितीश कुमार
इंटरनेटवर मोठी चर्चा आहे की, नितीश कुमार पुढील उपराष्ट्रपती असू शकतात. नितीश कुमार यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सूत्रांचे असे सांगणे आहे की, भाजपाला बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपातीलच एखाद्या व्यक्तीचा चेहरा हवा असेल तर ते राज्यातील निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांना उपराष्ट्रपती करू शकतात.
“बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देशाचे पुढील उपराष्ट्रपती होणार आहेत. बिहारमध्ये, भाजपा निवडणुकीसाठी स्वतःचा मुख्यमंत्री नियुक्त करेल. जेडीयूकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. नितीश यांचा मुलगा निशांत उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो,” असे राजकीय पत्रकार समीर चौगावकर यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, नितीश यांना उपराष्ट्रपती केले जाऊ शकते, तर धनखड यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
राजनाथ सिंह
सोशल मीडियावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाचीदेखील चर्चा होताना दिसत आहे. अनेकांचा असा अंदाज आहे की, धनखड यांच्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड केली जाऊ शकते. २०२२ मध्ये जेव्हा या पदासाठी निवडणूक झाली, तेव्हा राजनाथ सिंह यांचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणूनही समोर आले होते. यावेळीही सोशल मीडियावर अनेक जण असा अंदाज वर्तवत आहेत की, नवे उपराष्ट्रपती राजनाथ सिंह असू शकतात.
हरिवंश नारायण सिंह
हरिवंश नारायण सिंह यांच्या नावाचीदेखील चर्चा होताना दिसत आहे. जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचा उपराष्ट्रपतिपदासाठी पुढील पर्याय म्हणून उल्लेख केला जात आहे. याचे कारण म्हणजे ते सध्या राज्यसभेचे उपसभापती आहेत. संविधानाच्या नियमांनुसार, सिंह आजपासून धनखड यांच्या अनुपस्थितीत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राज्यसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. सोशल मीडियावरील वापरकर्ते असा दावा करत आहेत की, हरिवंश नारायण सिंह यांचे नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांशीही सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि म्हणूनच अनेकांना वाटते की एनडीए त्यांना उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार करतील.
शशी थरूर
सोशल मीडियावर ज्यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, ते म्हणजे काँग्रेस खासदार शशी थरूर. एका वरिष्ठ पत्रकाराने ‘एक्स’वर पोस्ट केल्यानंतर या अटकळीला वेग आला. त्यांच्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, “एनडीएचे दोन प्रमुख केंद्रीय मंत्री आणि शशी थरूर हे उपराष्ट्रपतिपदाचे संभाव्य दावेदार आहेत.” थरूर यांचे काँग्रेसशी असलेले मतभेद आणि मोदी सरकारशी असलेली जवळीक, विशेषतः ऑपरेशन सिंदूरवरील सरकारच्या संपर्क कार्यक्रमाचा भाग झाल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठी थरूर यांचे नाव पुढे येऊ शकते, अशी चर्चा वाढत आहे.
त्याशिवाय भारताच्या पुढील उपराष्ट्रपतिपदासाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या इतर नावांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावांचाही समावेश आहे. परंतु, हे सर्व अंदाज आहेत, कारण धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून एनडीए किंवा विरोधी पक्ष कोणाचा प्रस्ताव मांडतील, याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पुढील ६० दिवसांत होणार आहे.