कोल्हापूर : कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटी वेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी छत्रपती – ठाकरे घराण्यातील कौटुंबिक जिव्हाळ्याचा आवर्जून उल्लेख केला होता. मात्र या भेटीवेळी माजी खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती अनुपस्थितीत राहिल्याने त्याची चर्चा झाली. यावर, आपण शाहू महाराजांच्या प्रचारात असल्याचे स्पष्ट करताना संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्याशी संवाद साधून शाहू महाराजांच्या प्रचारात ते सक्रिय राहणार असल्याचा उल्लेख केल्याचे नमूद केले आहे.

मे २०२२ मध्ये राज्यसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. महाविकास आघाडी आणि महायुती यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सहावी जागा कोण जिंकणार याबद्दल चुरस निर्माण झाली होती. या जागेसाठी संभाजी राजे छत्रपती यांनी काही अपक्ष आमदारांचे पाठबळ मिळवून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. संख्याबळ अपुरे असल्याने त्यांनी सेनेकडे मदत मागितली होती. शिवसेनेची त्यांनी पुरस्कृत उमेदवार व्हावे असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तो संभाजी राजे यांनी नाकारतानाच निवडणुकीतील माघार घेतली.

हेही वाचा : ठाण्यासाठी गणेश नाईक नको, नवी मुंबईतील नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. त्यावर संभाजी राजे यांनी वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते. पण वाघासारखे दशा अंगी येत नाही. खोट्याची फजिती होते, अशा तुकाराम महाराजांच्या ओळी ट्विट करीत शिवसेनेवर निशाणा साधला होता. तर, छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचे आभार. राज्यसभा तो झाकी है स्वराज्य मे २०२४ अभी बाकी है, असा मजकूर असणारे बॅनर शिवसेना भवनासमोर त्यांच्या समर्थकांनी लावले होते.

यानंतर संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. वेगळ्याच घडामोडी घडत उमेदवारी शाहू महाराज यांना मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात आल्यावर शाहू महाराज हे मविआचे उमेदवार असल्याचे घोषित केले होते. यावेळी संभाजी राजे यांची अनुपस्थिती खटकली. त्यामागे राज्यसभेचे राजकारण असल्याचा मुद्दा जोडला गेला.

हेही वाचा : अरविंद केजरीवालांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला की भाजपाला? जाणून घ्या, त्यामागचे राजकारण

तथापि त्याचा इन्कार संभाजी राजे यांनी केला आहे. ‘ निवडणुकीच्या काळात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. मी माझ्या वडिलांच्या प्रचारात जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात आहे. खरे तर उद्धव ठाकरे यांनीच माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मविआची उमेदवारी माझ्या वडिलांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते. आता मी पुरते लक्ष प्रचारावर केंद्रित केले आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. यामुळे उद्धव ठाकरे -संभाजी राजे यांच्यात राज्यसभा निवडणुकीत ताणलेले संबंध लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा जुळत असल्याचे संकेत आहेत.