दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय दृष्ट्या एकच चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे वैभव खडेकर यांचा भाजप हुकलेला पक्षप्रवेश. शेकडो गाड्या कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले पण पक्षप्रवेश न करता माघारी परतले.

भाजप प्रवेशाला मुहूर्त नाही त्यामुळे सध्या विविध राजकीय चर्चांना सुरू झाले असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र हा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. दरम्यान असं असलं तरीही भाजपच्या एका बड्या नेत्याने खेडेकर यांना भाजपाचे काम सुरू करा, पक्षप्रवेश लवकरच होईल असं सांगितले आहे. दरम्यान वैभव खेडेकर यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मंगळवारी संध्याकाळी उशिरा डोंबिवली येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. चव्हाण यांच्या भेटीचे चित्रफीत वैभव खेडेकर यांनी प्रसारित केली आहे.

मंगळवारी खेड इथून मुंबईकडे रवाना होताना वैभव खेडेकर यांनीही आपण भाजपाचे काम यापूर्वी सुरू केल्याचे म्हटले होते. आता फक्त पक्ष प्रवेशाची औपचारिकता आहे, म्हणून आपण मुंबईकडे निघालो आहोत असे त्यांनी म्हटले होते. खेड भरणे येथील श्री काळकाई देवी मातेचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्ते व शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. मात्र भाजपच्या मुंबई नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेशाची कोणती तयारी नव्हती. येथे भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे खेडेकरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पुन्हा एकदा हुकला. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत नरिमन पाॅईंट भागात खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांचे राजकीय दृष्ट्या वजन कमी करण्यासाठी अन्य कोणता राजकीय बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा आहे. यामागे दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही नेते राजकीय दृष्ट्या पुढे आहेत. मात्र वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश त्या दोन नेत्यांना अडचणीचा का वाटतो? याचीही चर्चा सुरू आहे.

पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हुकल्यानंतर वैभव खेडेकर यांच व्हाट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘तुमच्या जिद्दीसमोर चक्रव्यूह सुद्धा फिका पडेल, राजकारणात थोडा उशीर झाला तरी जनतेचे प्रेम कायम तुमच्या पाठीशी राहील’ आमचे राजकीय अस्तित्व संपवणे इतके सोपे नाही. तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धी आम्हाला खानदानी देणगी आहे, जो धाडस करतो त्यालाच यश मिळतं… अशा स्वरूपाचे स्टेटस वैभव खेडेकर यांनी ठेवले आहेत. तसेच गाड्यांच्या ताफा असलेला व्हिडिओ ठेवला आहे.

भाजपाचे युवा नेते मंत्री नितेश राणे यांनी ४ सप्टेंबरची तारीख जाहीर करूनही वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश पुन्हा हुकला. यामुळे विविध राजकीय चर्चा तर्कवितर्क सुरू असले तरी हा भाजपा प्रवेश लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हा पक्षप्रवेश केला असला तरी रवींद्र चव्हाण यांची सविस्तर भेट झाली आहे. वैभव खेडेकर यांनी डोंबिवली येथे कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केल्याची सांगितले जात आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर चिपळूणचे संतोष नलावडे, माणगाव, रायगडचे सुबोध जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मनसेमधून बडतर्फ केले. पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र दिल.त्यानंतर वैभव खेडेकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी युवा नेते मंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला असला तरी, मात्र अद्याप हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त लाभलेला नाही.