Bihar election 2025 २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सद्वारे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे. मात्र, संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर अशी चर्चा सुरू केली आहे की, जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर राजकारण सोडण्याची शक्यता आहे. ही चर्चा नक्की का होत आहे? प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाविषयी एक्झिट पोल काय सांगतात? जाणून घेऊयात…
मंगळवारी सायंकाळपासून जवळजवळ सर्वच एक्झिट पोलनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. केवळ जर्नो मिरर एक्झिट पोलने महाआघाडी (महागठबंधनाचे) सरकार स्थापन होण्याची भविष्यवाणी केली आहे. बहुतेक सर्वेक्षण संस्थांचा अंदाज आहे की, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला १२२ जागांचा आकडा एनडीए सहजपणे पार करण्याची शक्यता आहे. हा आकडा समोर येताच प्रशांत किशोर राजीनामा देतील, ही चर्चा सुरू झाली आहे.
ही चर्चा का होतेय?
प्रशांत किशोर यांनी स्वतः आपण राजकारण सोडू, असा दावा निवडणुकीपूर्वीच्या त्यांच्या काही मुलाखतींमध्ये केला होता. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते की, नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) (जेडीयू) पक्षाला २५ हून अधिक जागा मिळणार नाहीत. बिहार एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतर, किशोर यांच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामुळे लोक विचारत आहेत की १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यावर ते खरोखरच राजकारण सोडतील का?
‘न्यूज १८ भारत’वरील रुबिका लियाकत यांच्याशी झालेल्या संभाषणात प्रशांत किशोर म्हणाले होते, “निकालानंतर, जर जेडीयू २५ हून अधिक जागा जिंकल्या, तर कृपया मला सांगा. जन सुराजने जिंकले तरीही मला कळवा; असे झाले तर मी राजकारण सोडेन.” कारण विचारल्यावर ते म्हणाले, “तुम्ही विचारले की हे कसे शक्य आहे? मी आत्मविश्वासाने सांगतोय की जेडीयू २५ हून अधिक जागा जिंकणार नाही. मी जे बोलतोय ते लिहून ठेवा.” प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “याचे कारण स्पष्ट करण्याची गरज नाही. ही एका प्रकारची पैज आहे. माझ्या दृष्टीने जेडीयूसाठी ही निवडणूक संपलेली आहे.”
यापूर्वी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रशांत किशोर यांनी असा अंदाज वर्तवला होता की जेडीयूला केवळ सहा जागा मिळतील. त्यांच्या अंदाजानुसार पक्षाने १२ जागा सुरक्षित केल्या. राजकीय तज्ज्ञांनुसार आता परिस्थिती अशी झाली आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. २०२० च्या बिहार निवडणुकीत जेडीयू ४३ जागांसह तिसरा मोठा पक्ष ठरला होता, ज्यामुळे नितीश कुमार यांचे युग संपले अशी अटकळ बांधली जात होती. तरीही कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवून दिला. याच मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी असेदेखील म्हटले होते, “संपूर्ण बिहारला माहीत आहे की, नितीश कुमार हे काहीही करण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत नाहीत.
एक्झिट पोलचा अंदाज काय?
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर सर्वत्र बिहार निवडणुकीत कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीची कामगिरी ही निराशाजनक दाखवण्यात आली आहे. ‘न्यूज १८’च्या एक्झिट पोलनुसार, २०२५ च्या निवडणुकीत जेडीयू सर्वाधिक जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे. मेगा एक्झिट पोलमध्ये एनडीएला १४० ते १५०, महाआघाडीला ८५ ते ९५, जन सुराजला ० ते ५ आणि इतरांना ५ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांनी सतत असा दावा केला आहे की, जन सुराजचे सरकार स्थापन होईल, त्यांचा पक्ष एकतर शीर्षस्थानी पोहोचेल किंवा तळ गाठेल अशी त्यांची भविष्यवाणी होती. मात्र, एक्झिट पोलच्या आधारावर, जन सुराज तळातच राहील असे दिसते.
जन सुराज पक्षाकडून त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत चांगला प्रभाव टाकण्याची आशा व्यक्त केली जात होती, परंतु एक्झिट पोलनुसार त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला पीपल्स पल्सने ० ते ५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. पीपल्स इनसाइटने ० ते २ जागा दिल्या आहेत. मॅट्रीझनेदेखील किशोर यांच्या पक्षाला ० ते २ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. जेव्हीसीने जास्तीत जास्त १ जागा मिळेल, असे सांगितले आहे. तसेच दैनिक भास्करनेदेखील जास्तीत जास्त ३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
बहुतांश एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थांनी एनडीएला किमान १४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उरलेल्या संस्थांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील, असे म्हटले आहे. सर्वच एक्झिट पोलद्वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळेल; तर राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसप्रणित महागठबंधनचा दारूण पराभव होईल.
दैनिक भास्करच्या पोलने एनडीएला १४५-१६० जागा, महाआघाडीला ७३-९१ आणि इतरांना ५-७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला, तर ‘टाईम्स नाऊ-जेव्हीसी’ पोलने एनडीएला १३५-१५० जागा, महाआघाडीला ८८-१०३ आणि इतरांना ३-६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला. ‘न्यूज १८’ पोलने एनडीएला १४०-१५० जागा, महाआघाडीला ८५-९५ आणि ‘जन सुराज’सह इतरांना ०-१५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. ‘आयएएनएस-मॅट्रिझ’ने एनडीएला १४७-१६७ जागा, महाआघाडीला ७०-९० आणि इतरांना २-८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला. ‘पी-मार्क’ पोलने एनडीएला १४२-१६२ जागा, महाआघाडीला ८०-९८ आणि इतरांना ०-३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला.
