गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून यावेळी महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे बघायला मिळते आहे. पहिल्या टप्प्यात ६०.७५ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून गेल्या निवडणुकीत हा आकडा ६४.३३ टक्के एवढा होता. तसेच पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीतही घट झाल्याचे बघायला मिळते आहे. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.०४ टक्के पुरुषांनी मतदान केले होते. मात्र, यंदा हा आकडा घसरून ६५.६९ टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा – Gujarat Election: मंदिर, दर्गा आणि आक्रमणकर्ते; पावागडमधील मंदिराचा मुद्दा भाजपासाठी महत्वाचा का आहे?

निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार, महिलांचे सर्वांत कमी मतदान गांधीधामध्ये (४५.५९ ) झाले असून त्यानंतर अनुक्रमे गढाडामध्ये ४७.५५ टक्के, धारीमध्ये ४८.७१ टक्के तर करंजमध्ये ४८.८९ टक्के महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

दक्षिण गुजरातमधील आदिवासी भाग असलेल्या डेडियापाडा, मांडवी, महुवा, व्यारा, निझर, वांसदा आणि धरमपूर यामतदार संघांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, तरीही या भागांमध्ये महिलांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा कमी आहे. पहिल्या टप्प्यात डेडियापाडा मतदारसंघात सर्वाधिक ८२.७१ टक्के मतदान झाले. मात्र, इथेही महिला मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा कमी आहे.

हेही वाचा – काँग्रेसने थेट रावणाशी तुलना केल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा आक्रमक; म्हणाले, “काँग्रेस नेते मला अपशब्द बोलतात, मात्र…”

दरम्यान, या संदर्भात बोलताना, १ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात विवाहाचे मुहूर्त असल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाल्याची प्रतिक्रिया गुजरात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाबेन दोषी यांनी दिली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्या म्हणाल्या, “यावेळी १ डिसेंबररोजी विवाहाचे मुहूर्त होते. त्याचा मतदानावर परिणाम पडला असण्याची शक्यता आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाचे म्हणजे, महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने पिंक बुथची स्थापना केली आहे. या बुथवर मतदान करण्याची सोय केवळ महिलांनासाठी आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात महिला मतदारांची संख्या वाढेल का, हे बघणं महत्त्वाचे आहे.