केरळच्या युवक काँग्रेसकडून खासदार शशी थरुर यांचा कोझिकोड येथील एक व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्याचे कारण राज्य काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून देण्यात आले नाही. कोझिकोडमधील युवक काँग्रेसच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत राजकारणाचा शशीर थरुर यांना फटका बसला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. मात्र, या निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव झाला होता. अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी ४७ सदस्यांची नवीन सुकाणू समिती स्थापन केली होती. या समितीत शशी थरुर यांना स्थान देण्यात आलं नव्हते. तसेच, गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकरांची यादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली होती. त्यातूनही शशी थरुर यांना वगळण्यात आलं होतं. त्यातच आता केरळमधील शशी थरुर यांचा कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे. यामुळे शशी थरुर यांचे पक्षात खच्चीकरण केलं जात नाही ना? अशी शंका उपस्थित होतं आहे.

हेही वाचा : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ‘फिल्डिंग’; ४० मतदारसंघातील प्रचारासाठी २९ नेते मैदानात

‘संघ परिवार आणि धर्मनिरपेक्षते पुढील आव्हाने’ यावर विषयावर काँग्रेस शशी थरुर आज ( २० नोव्हेंबर ) व्याख्यान देणार होते. यासाठी युवक काँग्रेसकडून तयारीही करण्यात आली होती. पण, कोझिकोड येथील युवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून व्याख्यान रद्द करण्यात आलं. व्याख्यान रद्द करण्यामागे कोणतेही कारण पक्षाकडून देण्यात आलं नाही. तर, हे व्याख्यान कोझिकोड येथील जवाहर युथ फाऊंडेशनतर्फे आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमाला कोझिकोडचे खासदार एम के राघवन उपस्थित राहणार आहे. तर, युवक काँग्रेस आयोजित केलेल्या कार्यक्रमात असलेले जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार यांचं नाव, वगळण्यात आलं आहे. एम के राघवन यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांना पाठिंबा दिला होता.

हेही वाचा : “राहुल गांधी गुजरातविरोधी”, ‘भारत जोडो’ यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागानंतर भाजपाचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल केरळ राज्य युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष के एस सबरीनाधन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “शशी थरुर या व्याख्यानाद्वारे केरळमधील काँग्रेसची धर्मनिरपेक्ष भूमिका स्पष्ट करु शकले असते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी काही नेत्यांकडून आदेश देण्यात आले, अशी माहिती माध्यमांद्वारे मिळाली,” असे के एस सबरीनाधन यांनी म्हटलं.