मोटारीमध्ये प्रवासी म्हणून घेतलेल्यांना रस्त्यात शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे आयटी कंपन्यांच्या मोटारींवरील चालक असून त्यांनी आयटी कंपनीतील एक अभियंता आणि हॉटेलच्या व्यवस्थापकाला याच पद्धतीने लुटल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  
खालीद अहमद शेख (वय ३२, रा. कन्हेरी, खंडाळ), नितांत गिरीश पवार (वय २३, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सलीम पापा शेख (रा. पिंपळे गुरव) याचा शोध सुरू आहे. याबाबत कमलकिशोर ओमप्रकाश मालवी (वय ३५, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवी हे कंपनीच्या कामाच्या निमित्ताने १९ मे रोजी मुंबईला जात होते. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाकडजवळ मोटारीची वाट पाहात होते. त्या वेळी आरोपींनी त्यांच्याजवळ येऊन ‘ मुंबईला जायचे का’ असे विचारलय़ावर ते मोटारीत बसले. मोटारीत बसल्यानंतर काही वेळातच रस्त्यात मोटारीत पाठीमागे बसलेल्या दोघांनी त्यांच्याजवळील लॅपटॉपची बॅग, एटीएमकार्ड, रोख रक्कम, सोने आणि चांदीचे दागिने आणि तीन मोबाईल काढून घेतले. त्यांना रावेत-औंध रस्त्यावर सोडून पसार झाले. या गुन्ह्य़ाचा तपास करीत असताना हा गुन्हा खालीद शेख याने केल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर दोघांच्या मदतीने हा गुन्ह केल्याचे सांगितले. मालवी यांचा मोबाईल आरोपींकडे मिळाला असून गुन्ह्य़ात वापरलेली इंडिगो मोटार जप्त करण्यात आली आहे.
हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीच्या मोटारींवर आरोपी हे चालक म्हणून काम करतात. याच कंपन्यात काम करणाऱ्यांना ओळखपत्रावरून ते हेरून त्यांना प्रवाशी म्हणून मोटारीत बसवत आणि त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून रस्त्यात सोडून देत. त्यांनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश भोसले यांनी दिली.