पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना वाढीव गुण; ‘ग्रेस’बाबतच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
‘परीक्षेला या.. उत्तीर्ण करण्याची जबाबदारी आमची’ अशी नवीच अभिनव पद्धत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केल्याचे दिसत आहे. अभियांत्रिकी शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची (वाढीव गुण) शिडी लावून उत्तीर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठाने नुकताच घेतला. मात्र त्यातही नियमांची तमा न बाळगता मर्यादेपेक्षा जास्त गुण देण्यात आले असल्याची तक्रार अभियांत्रिकी शाखेच्याच शिक्षकांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठाचा निकाल सावरण्यासाठी गुणांची ही खिरापत वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकालावर आक्षेप आल्यानंतर निकाल सावरण्यासाठी म्हणून विद्यापीठाकडून गुणांची खिरापत वाटण्यात आली आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा गुण वाढवून देण्याच्या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांना दोन वेळा ‘ग्रेस’ गुण मिळाले आहेत, तर काही विद्यार्थ्यांना नियमापेक्षाही जास्त गुण मिळाल्याची तक्रार शिक्षकांकडून केली जात आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या निकालात त्रुटी असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठाच्या नियमावलीतील चौथ्या नियमाचा (ऑर्डिनन्स ४) काही विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आणि काही विद्यार्थ्यांना मिळाला नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. राजकीय नेत्यांनीही विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवली. या सगळ्यावर आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना नियम (४)चे लाभ देऊन दहा गुण वाढवून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र नियमांनी घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा काही विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत.

* विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही एका नियमाचा वापर करून ग्रेस गुण देता येतात. त्यानुसार मुळात उत्तीर्ण होण्यासाठी निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळत असतात. मात्र त्याला दहा गुणांची मर्यादा आहे.
* त्याचप्रमाणे नियमावलीतील चौथ्या नियमानुसार विद्यार्थी एखाद्याच विषयात अनुत्तीर्ण होत असेल, तर त्याला तोंडी आणि लेखी परीक्षेसाठी त्या विषयाच्या १ टक्का किंवा १० गुण यातील जे गुण कमी असतील ते देता येतात.
* प्रत्यक्षात गुणांची खिरापत वाटताना गुणांच्या कमाल मर्यादेचा नियम विद्यापीठाकडून पाळण्यात आलेला नाही.
* एका विषयासाठी उत्तीर्ण होताना ग्रेस गुण मिळालेले असताना दुसरा नियम लावून दुसऱ्या विषयालाही गुण देण्यात आले आहेत.

गुण वाटा, आक्षेप टाळा?

विद्यापीठाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने आक्षेप घेण्यात येतात. उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना मिळू शकत असल्यामुळे त्यांना आपल्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनाचीही शहानिशा करता येते. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले किंवा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले की साहजिकच विद्यार्थी शांत बसतात. त्यांच्याकडून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही कमी होते. त्यामुळेच ही गुणांची खिरापत वाटली जाते का, अशी शंका एका शिक्षकाने उपस्थित केली आहे.

विद्यापीठाचे निकाल हे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातूनच लागतात. सर्व नियमावली संगणक प्रणालीवर लोड करण्यात आली आहे. नियमांच्या अंमलबजावणीत काही गोंधळ होण्याची शक्यता नाही. एखाद्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला असल्यास शिक्षकांनी हा प्रकार परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा. याबाबत नेमण्यात आलेल्या समितीसमोर हे प्रकरण ठेवून त्याची शहानिशा करण्यात येईल.
– डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ