करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या बाधित भागात पोलिसांनी लागू केलेले अतिरिक्त निर्बंध गुरूवारी (२३ एप्रिल) मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात येणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध शिथिल ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा माल विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत.

याबाबत सुधारित आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गुरूवारी रात्री जारी केला. शहरातील काही भाग करोना संक्रमणशील असल्याचे आढळून आल्यानंतर या भागात सोमवारपासून (२० एप्रिल) अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत हे निर्बंध लागू ठेवण्यात आले होते. त्यानंतर सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी सुधारित आदेश जारी करून गुरुवारी मध्यरात्री बारानंतर अतिरिक्त निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, शहरात जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील पूर्वभागातील समर्थ, खडक, फरासखाना, कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी, वानवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अतिरिक्त निर्बंध लागू केले होते. या निर्बंधानंतर या भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेदेखील बंद ठेवण्यात आली होती. फक्त सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत दूध विक्रीची मुभा देण्यात आली होती.