गणेश मंडळांच्या जाहिरातबाजीचा पादचारी, वाहनचालकांना फटका

मंडळाच्या तिजोरीत भर पाडण्यासाठी मिळेल त्या जागी जाहिरातींचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याच्या गणेशोत्सव मंडळांच्या पद्धतीमुळे आता शहरातील वाहतूक कोंडीतही भर पडू लागली आहे. विशेषत: मध्यभागातील पादचारी मार्ग आणि रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेल्या कमानींमुळे वाहतूक कोंडीत रोज भर पडत आहे. गणेशोत्सवात मध्यभागात दर्शनासाठी येणारे भाविक तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, या कमानींकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.

शहराच्या मध्य भागात विशेषत: शनिपार, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, मंडई, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या भागात दाटीवाटीने गणेशोत्सव मंडळांच्या जाहिरात कमानी उभ्या आहेत. विश्रामबाग वाडय़ासमोर तर पादचारी मार्गावरच कमान उभारण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजीराव रस्ता शाखेच्यानजीक तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका जाहिरात कंपनीने पादचारी मार्गावर मांडव टाकून तेथे एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जाहिरात केली आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या दारात टाकलेल्या कमानींमुळे कुमठेकर रस्त्यावरून मंडई तसेच बाजीराव रस्ता मार्गे शनिवारवाडय़ाकडे जाणाऱ्या वाहनांना वळणेही अवघड झाले आहे. मध्यभागात कमानींच्या माध्यमातून अक्षरश: जाहिरातींचे युद्ध पाहायला मिळत आहे. फुटाफुटांवर करण्यात आलेली जाहिरातबाजी डोळे दिपविणारी आहे आणि ती सामान्यांना वेठीस धरत आहे.

कमानी उभारण्यास महापालिका आणि पोलिसांकडून परवानगी देण्यात येते. पुणे शहरात जर्मन बेकरी आणि जंगलीमहाराज रस्त्यावर झालेल्या बाँबस्फोटानंतर पोलिसांनी बॉक्स कमानींबाबत कडक धोरण स्वीकारले होते. पूर्वी टाकण्यात येणाऱ्या कमानी चारही बाजूंनी कापडाने झाकलेल्या असायच्या. अशा कमानींमध्ये स्फोटके दडविली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अशा प्रकारच्या कमानींना परवानगी नाकारण्यात येते. त्या ऐवजी पोलिसांकडून बंदिस्त कमानींऐवजी खालून तीन ते चार फूट मोकळ्या ठेवलेल्या कमानींना परवानगी दिली जाते. सध्या उभारण्यात आलेल्या कमानी लोखंडी बारचा वापर करून उभारण्यात आल्या आहेत. मात्र, मोठय़ा आणि अरुंद रस्त्यांवरही या कमानी उभारण्यात आल्यामुळे अशा रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असतानाही कोंडी होऊ लागली आहे.

गणेशोत्सवात एखाद्या नवीन उत्पादनांची जाहिरात करण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून पडला आहे. त्यामध्ये देशातील अगग्रण्य वाहन उत्पादक कंपन्याही  मागे नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे निर्माते, मोबाईल कंपन्या तसेच खासगी दूरसंचार क्षेत्रातील कं पन्या त्यात आघाडय़ावर आहेत. उत्सवाच्या दहा दिवसांत मोठय़ा संख्येने येणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी शहरातील विविध मंडळांच्या मुख्य मंडपापासून पुढे दोन्ही बाजूंनी पन्नास ते शंभर मीटर अंतरापर्यंत कमानी टाकल्या जातात. या कमानींसाठी उत्पादक  आणि जाहिरात कंपन्या महिनाभर आधी मोक्याच्या जागा असलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी करतात. मंडळांसोबत करार करण्यात येतो. जाहिरात कमानींच्या माध्यमातून लाखो रुपयांचे अर्थकारण उत्सवाच्या कालावधीत होते.

या संदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना एक पोलीस अधिकारी म्हणाले की, मुळात कमानींविषयी महापालिका आणि पोलिसांनी निश्चित धोरण ठरविणे गरजेचे आहे. मात्र, हे धोरण ठरविले न गेल्यामुळे रस्ता व्यापणाऱ्या क मानी टाकण्यात आल्या आहेत. या कमानींमुळे वाहतुकीला अडथळे होत आहेत. कारवाई के ल्यास मोठय़ा प्रमाणावर राजकीय दबाब येतो. मंडळाचे कार्यकर्तेही कारवाईला विरोध करतात.