बोपखेलमधील रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना होणारा अटकाव व दापोडीतून बोपखेल मार्गावर सातत्याने होणारा जाच यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. बाबर यांनी चर्चा केल्यानंतर काही प्रमाणात सौम्य भूमिका घेण्याची तयारी लष्करी अधिकाऱ्यांनी दर्शवल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दापोडीतून बोपखेलमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर लष्कराने कडक तपासणी सुरू केली आहे. बोपखेलशिवाय अन्य भागातील नागरिकांना विशेषत: रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना प्रवेश देताना अटकाव करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला मान्यता दिली जात नव्हती. स्थानिक नागरिकांना ओळखपत्रांची सक्ती होत होती. अलीकडे, हेल्मेटची सक्ती करण्यात आली. या सर्व प्रकारास ग्रामस्थ कंटाळले होते. स्थानिक नगरसेवक संजय काटे यांनी गेल्या काही दिवसांपासून लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी धरणे धरले. खासदारांना या प्रकाराची कल्पना देण्यात आली, तेव्हा ते दापोडीत दाखल झाले. प्रवेशद्वाराजवळ तणाव निर्माण झाला, तेव्हा भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश केकाणे व त्यांचे पथक दाखल झाले. यावेळी खासदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला. शिवसेनेचे िपपरी शहरप्रमुख योगेश बाबर, रोमी संधू, मंगल घुले, सुनील ओव्हाळ, तुषार नवले यांच्यासह नगरसेवक संजय काटे यांच्यासह राजू घुले, शशिकांत घुले, मेहबूब शेख, भाग्यदेव घुले, लिओनार्ड वाझ आदी यावेळी उपस्थित होते
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
लष्करी जाचाच्या विरोधात आम्ही प्रवेशद्वारासमोर बसलो. शिष्टमंडळासमवेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महिला, ज्येष्ठ व आजारी नागरिकांवर सक्ती करू नये. लग्न व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होता कामा नये आदी मागण्या केल्याचे खासदार गजानन बाबर यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. या संदर्भात, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे तक्रार केली असून ते प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.