राज्याने नागरिक नोंदणीविरोधात ठराव करावा!

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणले आहे. त्यामुळे आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशाने ठरवायचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

तर सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधी ठराव करणारी पत्रे नागरिकांनी सरकारला लिहावीत तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा लागू करणार नाही, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने करावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गुरुवारी येथे केली.

महाराष्ट्र स्मारक निधीच्या वतीने सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत डॉ. सप्तर्षी बोलत होते.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ‘संविधान बचाओ, देश बचावो’ या महासभेचे आयोजन गुरुवारी सारसबाग परिसरात करण्यात आले होते. या वेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले, की हिटलरने जे जर्मनीत घडविले तेच सध्या आपल्या देशात घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानावरील हल्ल्याविरोधात महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या अहिंसेच्या मार्गानेच पुढे जावे लागणार आहे. इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असेही ते म्हणाले.

सत्याग्रही मासिकाच्या नागरिकत्व कायदा आणि २९ व्या वर्षांरंभ विशेषांकाचे प्रकाशन तसेच ‘एनआरसी’ या शेखर सोनाळकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सप्तर्षी म्हणाले, की सरकार आपल्याकडे कागद मागत असेल, तर त्यांना मध्यावधी निवडणूक घेऊन जनादेशाचा कागद मागा.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा संविधानावरील हल्ला आहे.

– जितेंद्र आव्हाड,

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे ४० कोटी नागरिक देशोधडीला लागतील. हा लढा केवळ मुस्लिमांचा नाही, तो सर्वाचा आहे.

– कुमार सप्तर्षी,सामाजिक कार्यकर्ते

नागरिकत्व कायद्याच्या वणव्यात शांत बसू नका.

– ऊर्मिला मातोंडकर, अभिनेत्री

हिंदू किंवा मुसलमान म्हणून रस्त्यावर उतरलो तर आपण यशस्वी होणार नाही. भारतीय म्हणून रस्त्यावर उतरलो तर यश नक्की मिळेल. नागरिक विरुद्ध भाजप अशी ही लढाई आहे. देशासाठी हा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे.

जिग्नेश मेवाणी, आमदार, गुजरात