04 March 2021

News Flash

चित्रपट रसास्वादाची सुरुवात ‘शोले’ किंवा ‘बजरंगी भाईजान’पासून हवी! – अतुल कुलकर्णी

लोकप्रिय चित्रपटालाही छायाचित्रण, पटकथा, संकलन, संगीत या बाजू असतातच

| September 7, 2015 03:20 am

‘चित्रपट रसास्वाद शिबिरांची सुरुवात थेट अभिजात चित्रपटांनी करण्यापेक्षा आधी या शिबिरांमध्ये ‘शोले’ किंवा आजच्या ‘बजरंगी भाईजान’सारखे चित्रपट दाखवायला हवेत. ज्या लोकप्रिय चित्रपटांवर प्रेक्षक पोसला जातो त्याच चित्रपटांची नव्याने ओळख होणे ही चित्रपट रसास्वादातील एक महत्त्वाची पायरी आहे. प्रेक्षकांची या चित्रपटांकडे पाहण्याची दृष्टी बदलली तरच रसास्वादाचा खरा उपयोग आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’च्या (एफएफएसआय) राज्य शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिराचे उद्घाटन अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. व्ही शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, एफएफएसआय सचिव सुधीर नांदगावकर, संस्थेच्या राज्य शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र चित्राव, शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, ‘चित्रपट रसास्वाद शिबिरांमध्ये एकदम अभिजात चित्रपट पाहणे आणि ते इंग्रजी माध्यमातून समजावून घेणे हा प्रशिक्षणाथींपुढचा एक अडथळा ठरतो. अशा शिबिरांची सुरुवात ‘शोले’ नाहीतर ‘बजरंगी भाईजान’पासून करायला हवी. लोकप्रिय चित्रपटालाही छायाचित्रण, पटकथा, संकलन, संगीत या बाजू असतातच. हे चित्रपट बघून मोठय़ा होणाऱ्या सामान्य माणसाला ते वेगळ्या अंगाने उलगडून सांगितल्यास लगेच समजू शकेल.’

‘चित्रपटांचा व्यवसाय हा व्यवसाय म्हणून टिकला,
तरच कला म्हणून टिकेल’
अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘चित्रपट ही महागडी कला आहे. त्याच्या अर्थकारणाचा भाग कलेपेक्षा मोठा आहे. चित्रपटांचा व्यवसाय हा व्यवसाय म्हणून टिकला तरच तो कला म्हणून टिकेल. चित्रपटांच्या पायाभूत सुविधा व्यावसायिक चित्रपटांमुळेच उभ्या असून त्याचा आदर करायला हवा,’ सध्या चित्रपट बनवणाऱ्यांसाठी उत्तम काळ असून वेगळे चित्रपट बनवण्याची संधी त्यांना मिळते. एखादा चित्रपट आताच का आला आणि का चालला याची सामाजिक व आर्थिक कारणे असतात, असेही त्यांनी सांगितले. बहुपडदा चित्रपटगृहांविषयीच्या वादासंबंधी पत्रकारांनी विचारले असता, ‘बहुपडदा चित्रपटगृहे व्यावसायिक आहेत, जो चित्रपट चालतो तो तिथे लावला जातो,’ असे कुलकर्णी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 3:20 am

Web Title: atul kulkarni movie ffsi nfai
टॅग : Atul Kulkarni
Next Stories
1 ‘समाजकार्य करणाऱ्या राजकीय नेत्यांकडे एवढी संपत्ती कशी?’
2 ‘पीआयसीटी’ची पुरुषोत्तम करंडकावर मोहोर
3 लाखो शिक्षक अतिरिक्त ठरतातच कसे? – अजित पवार
Just Now!
X