News Flash

पिंपरी भाजीमंडईत पुन्हा मोठी गर्दी

नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार

संग्रहित छायाचित्र

नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार; महापालिकेच्या दोन वेगळ्या आदेशांमुळे संभ्रमावस्था

पिंपरी : पिंपरी बाजारपेठेतील मुख्य भाजीमंडई सुरू करण्याविषयी महापालिकेने काढलेले परिपत्रक, त्यानंतर काढलेला सुधारित आदेश यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे बुधवारी भल्या सकाळी पंचक्रोशीतील भाजीविक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली. मंडईत पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

बाजारपेठेतील भाजीमंडई काही दिवसांपूर्वी महापालिकेने बंद केली होती. सर्वच स्तरातून दबाव आल्याने मंडई पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हा मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली म्हणून दोन तासांत मंडई बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. गेल्या आठवडय़ातील ही घटना ताजी असताना बुधवारी सकाळी त्याची पुनरावृत्ती झाली. महापालिकेच्या कारभारातील समन्वयाचा अभाव हे त्यास कारण ठरले.

महापालिकेने मंगळवारी दुपारी काढलेल्या पहिल्या आदेशानुसार, बुधवारपासून सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत भाजीमंडई सुरू राहील, असे जाहीर करण्यात आले होते. रात्री उशिरा हा आदेश मागे घेण्यात आला. भाजी मंडई बंदच राहील. मोकळ्या जागांमध्ये मंडईचे स्थलांतर करण्यात येईल, असे दुसऱ्या आदेशात स्पष्ट करण्यात आले.

हा सुधारित आदेश नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही. पहाटेपासून पंचक्रोशीतील शेतकरी भाजीपाला घेऊन मंडईत पोहोचले होते. टाळेबंदीमुळे बाहेर पडता येत नसलेल्या नागरिकांनी भाजीमंडईत खरेदीसाठी मोठी गर्दी केली. सकाळी सहाच्या सुमारास गर्दी आणखी वाढली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि पालिका अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मंडईत दाखल झाले. गर्दी कमी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. भाजी खरेदीसाठी तुटून पडलेले नागरिक काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यामुळे पळापळी सुरू झाली आणि गर्दी पांगू लागली. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या घटनेचे खापर महापालिकेवर फोडले असून पालिकेने मात्र याविषयी कोणतेही भाष्य केले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:15 am

Web Title: big crowds in vegetable market at pimpri zws 70
Next Stories
1 टाळेबंदीतही बँकांच्या एटीएमचे काम पूर्ण क्षमतेने
2 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २६ नवे अभ्यासक्रम शिकण्याची संधी
3 Coronavirus : शहरासह जिल्ह्यातील करोनाच्या सद्य:स्थितीचा अहवाल राज्य सरकारकडे
Just Now!
X