News Flash

“मला जे आश्वासन दिलं…”, पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा सुरु असतानाच मेधा कुलकर्णींचा व्हिडीओ आला समोर

विधानसभा निवडणुकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कापत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती

संग्रहित

भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मेधा कुलकर्णी भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जात होतं. यादरम्यान मेधा कुलकर्णी यांनी स्वत: एक व्हि़डीओ शेअर केला असून वे वृत्त खोटं असून आपण भाजपामध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकला हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी मला पक्षाने जे विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या आहेत –
‘गेले दोन दिवस माझ्या संदर्भातील ज्या खोट्या बातम्या मुद्दामून प्रसारित केल्या जात आहेत त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आवर्जून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. मी कुठेही जात नाहीये, भाजपातच आहे. यापूर्वीही मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या संपर्कात नव्हती, आजही नाही. मागच्या वर्षी जेव्हा मला विविध पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या, त्यावेळीही नम्रपणे नकार दिला होता. पक्षांतर्गत काही प्रश्न जरुर आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं पक्षीय पातळीवर सोडवली जातील अशी आशा आहे त्यामुळे त्याबद्दल जाहीर वाच्यता करण्याची गरज वाटत नाही,” असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “चंद्रकांत पाटील यांनी मला विधानपरिषदेचं आश्वासन देताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. त्यांनी काही व्यक्तींना आश्वासन आणि शब्द दिला आहे. एखाद्याला शब्द दिल्यानंतर त्याची मानसिकता काय असते यासंदर्भात त्यांनी किती परिश्रम केलेले असतात याची मला कल्पना आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशीच इच्छा असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचा प्रश्न उद्धभवत नाही. मला पक्षाने जे विधानपरिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वास आहे”.

२०१९ विधानसभा निवडणुकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कापत त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळणं अशक्य असल्यामुळे मेधा कुलकर्णी मनसेकडून नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार अशी चर्चा सुरु होती. परंतू सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्यांवर मेधा कुलकर्णी यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं.

“भारतीय जनता पार्टी माझ्याबद्दल जो काही निर्णय घेणार असेल तो मला मान्य आहे. पक्षाकडून जे आदेश येतील त्यानुसार मी माझी कामं करणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी सध्या नोंदणी उपक्रम हातात घेतला असून यापुढेही पक्षाच्या ध्येय धोरणांप्रमाणेच काम करत राहणार,” असल्याचं मेधा कुलकर्णींनी स्पष्ट केलं.

सोमवारी पुण्यात कोथरुडचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला मेधा कुलकर्णी या अनुपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतरच मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा पुण्यात रंगत होत्या. या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊनही कुलकर्णी हजर न राहिल्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आलं होतं. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना यावर अधिक प्रतिक्रिया देण्यास कुलकर्णी यांनी नकार दिला. हा पक्षांतर्गत मुद्दा असून याबद्दल मला प्रसारमाध्यमांशी बोलायचं नाही. आम्ही अंतर्गत तो विषय सोडू असं म्हणत कुलकर्णी यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:05 pm

Web Title: bjp medha kulkarni on reports of resigning from party sgy 87
Next Stories
1 सातारा रस्ता बीआरटी मार्ग तूर्त बंदच
2 पुण्यात रात्रीच्या तापमानात घट
3 धनदांडग्यांच्या विरोधामुळे पोलीस मेटाकुटीला
Just Now!
X