शरीरसौष्ठवातही जो जीता वहीं सिकंदर असतो आणि जिंकणं माझ्या रक्तात भिनलंय. मी आजवर कधीही विजयाने हुरळून गेलेलो नाही आणि आता मला कुणाचीही भीती वाटत नाही. मी गेले चार महिने घाम गाळलाय, पुण्यातही मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीच उतरणार आहे. रोहा आणि गुरगावपाठोपाठ मला आता पुणेही जिंकायचेय. शरीरसौष्ठवात नशीबाच्या जोरावर कुणी जिंकत नाही, इथे फक्त कामगिरीच बोलते आणि येत्या रविवारी मीसुद्धा मि.इंडियाची हॅटट्रीक साकारण्यासाठी उतरणार आहे, असा ठाम विश्वास सलग दोनवेळा मि.इंडिया किताब जिंकणाऱ्या सुनीत जाधवने बोलून दाखवला.

येत्या शुक्रवारपासूनच म्हणजे 23 ते 25 मार्चदरम्यान पुण्याच्या बालेबाडीत पुन्हा एकदा नसानसात शरीरसौष्ठव भिनणार आहे. भारतातील 600 खेळाडूंची पावले बालेवाडीच्या दिशेने चालली असून महाराष्ट्राचाही सर्वात बलशाली संघ मि.इंडियासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दिग्गज खेळाडूंनी पुण्यात महाराष्ट्राचाच जयघोष होणार, असल्याची ग्वाही दिली. मि. इंडियाची हॅटट्रीक करण्यासाठी उत्सुकच नव्हे तर सज्ज असलेला सुनीत जाधव जबरदस्त तयारीत दिसला. तो म्हणाला, यावेळी मला मि.इंडियाची हॅटट्रीक करायचीच आहे.

यजमान महाराष्ट्रालाही सांघिक जेतेपद मिळवून द्यायचेय. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सर्वात बलशाली म्हणून समोर आला तर कुणीही आश्चर्य मानू नये. कारण आपल्या खेळाडूंनी केलेली अभूतपूर्व तयारी पाहून अवघ्या शरीरसौष्ठव जगताचे डोळे विस्फारणार आहे. माझा सहकारी महेंद्र चव्हाण, सागर कातुर्डे, अक्षय मोगरकर, सुजन पिळणकर, अतुल आंब्रे, नितीन म्हात्रे, रोहित शेट्टी आणि महेंद्र पगडेसारखे खेळाडू सुवर्णमयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मला कल्पना आहे की, यंदाची मि.इंडिया खूप आव्हानात्मक आहे. खूप तगडे खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत, पण आमचे खेळाडू कुणापेक्षा जराही कमी नाहीत. त्यामुळे पुण्यात महाराष्ट्राचाच बोलबाला राहणार, हे निश्चित असल्याचेही तो म्हणाला.

गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या स्पर्धेत फक्त आणि फक्त सुनीतचेच नाणे वाजले आहे. फक्त एका तळवलकर्स क्लासिकचा अपवाद वगळला तर सुनीत ज्या स्पर्धेत उतरलाय, ती स्पर्धा त्याच्याच नावावर झालीय. आपल्यासाठी आताचे वर्षे खूप यशस्वी ठरत असल्यामुळे सुनीत भरभरून बोलला. चार वर्षांपूर्वी मला स्टेजवर उतरल्यावर मोठे खेळाडू पाहून माझ्या मनात थोडी धाकधूक व्हायची.  पण आता परिस्थिती बदललीय. आता मला कुणाचीही भीती वाटत नाही आणि मी कधी पराभवाने निराशही होत नाही. कोशीश करनेवालों की कभी हार नहीं होती है, हे मी चांगलंच जाणलं आहे. मेहनतीने प्रयत्न केले की यश हे मिळतेच. चारवर्षांपूर्वी जेव्हा मी पुन्हा एकदा शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरलो तेव्हा एकदा तरी मुंबई श्रीचा किताब जिंकावा, हे माझे स्वप्न होते. पण आता मी भारतातील सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकलोय.

गेल्या चार वर्षात टप्प्याटप्प्यावर माझी स्वप्नंही वाढली आहेत. मुंबई श्रीनंतर महाराष्ट्र श्रीचे जेतेपदही मी पटकावले. गेली पाच वर्षे ते मीच पटकावतोय. सलग दोनदा भारत श्रीसुद्धा झालोय. आता आंतरराष्ट्रीय मंचावर मला सर्वांना जन गण मनचे सूर ऐकवायचे आहे.  मी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी झालो होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी कशी केली जाते, याचे मला अज्ञान होते. मात्र आता मी स्वताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार केलेय. त्यामुळे मि.वर्ल्डसारख्या स्पर्धेत मी सुवर्ण पदकावर समाधान मानणार नाही. मला मि.वर्ल्ड मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा बहुमान मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलवायची आहे. माझे स्वप्न जरा अवघड आहे, पण अशक्य नाही. त्यामुळे मी माझे हे स्वप्नही लवकरच साकारणार, याचा मला पूर्ण विश्वास असल्याचेही सुनीतने छातीठोकपणे सांगितले.

शरीरसौष्ठवावर लोकांचे प्रेम आधीपेक्षाही खूप वाढलेय. आता तर आम्ही स्टार झालो आहोत. आमच्या खेळाला लोकाश्रय तर मिळाला पण राजाश्रय मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. आमचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नसल्यामुळे सरकारकडून अपेक्षीत मदत मिळत नाही. पण लोकमान्य असलेला हा खेळ लवकरच राजमान्य होईल आणि जगमान्यही होईल. सरकार दरबारी आमच्या खेळाला सन्मानाचे स्थान मिळेल. तो दिवस आता फार दूर नाही. चेतन पाठारे यांच्या नेतृत्वाखाली इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने खेळाच्या केलेल्या भरभराटीमुळे आम्हा खेळाडूंना पालकच लाभले आहेत. ते आमची अगदी स्वताच्या मुलांसारखीच आमची काळजी घेत आहेत. याचमुळे आम्ही जगात कुठेही असो, आम्हाला सकस आहार आणि उत्तम निवास व्यवस्था प्राधान्याने मिळतेय. एवढेच नव्हे तर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा मोठा संघ सहभागी होतोय. हे आधी होत नव्हतं, जे आता पाठारेंमुळे शक्य झाल्याचेही सुनीतने आवर्जून सांगितले.

भारत श्री स्पर्धेत पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न या स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक खेळाडूचेही आहे. यंदा मोठ्या संख्येने खेळाडू येणार असल्यामुळे स्पर्धा खूप जबरदस्त रंगणार आहे. जेतेपदाच्या लढतीत माझ्यासमोर जावेद खान, रामनिवास, महेंद्र पगडे, दयानंद सिंगसारखे दिग्गज आहेत. कोण किती तयारीत आहे, याची मला कल्पना नाही, पण मी माझ्या सर्वोत्तम तयारीत आहे. महाराष्ट्राचा संघही तयारीत आहे. यजमान महाराष्ट्राचे अ आणि ब असे दोन संघ उतरणार आहेत. खरं सांगायचं तर पुण्यात सर्वांना जय महाराष्ट्रच बोलावे लागणार आहे पक्के आहे.

महाराष्ट्र अ संघ : विनायक गोळेकर, नितीन म्हात्रे, प्रतिक पांचाळ, श्रीनिवास वास्के, सुयश पाटील, सागर कातुर्डे, अजय नायर, सुनीत जाधव, महेंद्र चव्हाण, महेंद्र पगडे, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे

महाराष्ट्र ब संघ :  संदेश सकपाळ, श्रीनिवास खारवी, रितेश नाईक, सचिन खांबे, रोहन गुरव, सुशील मुरकर, रवी वंजारे, सुशांत रांजणकर, रोहित शेट्टी, सकिंदर सिंग, राखीव खेळाडू (जगदीश लाड, श्रीदीप गावडे, नितीन शिगवण)