कोटय़वधी रुपये खर्च करून पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या बीआरटी प्रकल्पात नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार करण्यात आला नाही, बीआरटीमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे ती सुविधा न होता तीव्र डोकेदुखी झाली आहे आणि आगामी काळात त्याचे स्वरूप आणखी भयंकर होईल, अशा शब्दांत स्थायी समिती सदस्यांनी मंगळवारी बीआरटीविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रसाद शेट्टी यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. बीआरटीमुळे होणारे विविध त्रास विशद करताना ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवेश करण्याच्या व बाहेर पडण्याच्या जागांमध्ये गफलत झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. काळभोरनगर अथवा एम्पायर इस्टेट येथे जायचे असल्यास प्रचंड वाहतूक कोंडी पार करून वळसे मारून जावे लागते, असे उदाहरण त्यांनी दिले. मोरवाडी सिग्नल ते बॉम्बे सिलेक्शन या बाजारपेठ असलेल्या प्रमुख रस्त्यावर संध्याकाळी होणारी भीषण कोंडी बीआरटीमुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त राजीव जाधव यांनी सहा महिन्यांपूर्वी मयूर ट्रेड सेंटर येथे येऊन अरुंद रस्त्यांची पाहणी केली. समस्येची तीव्रता लक्षात आल्यानंतर यात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. काही ठिकाणी पदपथ लहान करण्यात आले. मात्र, जेथे खरोखर गरज आहे, तेथे आवश्यक उपाययोजना नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अन्य सदस्यांनी शेट्टी यांच्या मुद्दय़ांना अनुमोदन दिले. अखेर, आयुक्त जाधव यांनी येत्या १५ दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.