News Flash

दाभोलकर हत्येमागे ‘सनातन’चा तावडेच

सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, सारंग अकोलकर आणि विनय पवार हे सहआरोपी

डॉ. नरेंद्र दाभोलकर

सीबीआयकडून आरोपपत्र दाखल, सारंग अकोलकर आणि विनय पवार हे सहआरोपी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात  सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असून सारंग अकोलकर आणि विनय पवार या साथीदारांच्या मदतीने तावडेने ही हत्या घडविली, असे आरोपपत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केले. अकोलकर आणि पवार हे दोघेदेखील ‘सनातन’चेच साधक असून मडगाव बॉम्बस्फोटातही हात असलेला अकोलकर हा फरारी आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांच्या न्यायालयात या २४पानी आरोपपत्रासोबत सीबीआयने २० टिपणेही सादर केली. त्यात सनातन संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचीही कात्रणे आहेत. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणी अटक झालेले इचलकरंजीतील शस्त्रास्त्र तस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत, याचीही माहिती आरोपपत्रात आहे.

येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तावडेचा कोल्हापूरमधील कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातही हात असल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांना होता. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तावडेचा ताबा गेल्या आठवडय़ात घेतला होता. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी तेथील सहा सफाई कामगारांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात आली होती. मारेक ऱ्यांनी गोळीबार केल्यानंतर मोठा आवाज झाला. मारेकरी दुचाकीवरून पसार झाले, असे साक्षीदारांनी सांगितले होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्वरची शस्त्रास्त्र तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. परदेशातून बॅलेस्टीक एक्सपर्टचा अहवाल मागविण्यात आला आहे. फरारी आरोपींनी तावडेच्या दुचाकीचा वापर केला आहे. याबाबत तपास करायचा आहे, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

तावडेची पाश्र्वभूमी..

तावडेने मुंबईतून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २००१ पर्यंत तो कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय करायचा. सनातनचे संस्थापक डॉ. जयवंत आठवले यांच्या भाषणाने तो प्रभावित झाला होता. १९९८ मध्ये तो सनातन संस्थेच्या संपर्कात आला. सन २००१ मध्ये त्याने वैद्यकीय व्यवसाय बंद केला. २००३ मध्ये तो सनातनचा समन्वयक म्हणून काम पाहू लागला. तो हिंदू जनजागृती समितीचे काम पाहत होता. २००५ मध्ये त्याने डॉ. दाभोलकर यांची कोल्हापूरमध्ये झालेली सभा उधळली होती. तसेच गोविंद पानसरे यांनी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्याला विरोध करण्यासाठी तावडेने देखील एक मोर्चा काढला होता.

वीस टिपणे कोणती?

  • सनातन प्रभात वृत्तपत्र तसेच अन्य वृत्तपत्रांमधील कात्रणे.
  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेली संशयितांची छायाचित्रे.
  • तावडे आणि सनातन संस्थेच्या आश्रमावरील छाप्यात हस्तगत झालेली कागदपत्रे.
  • डॉ. दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी सनातन प्रभातमध्ये छापून आलेली व्यंगचित्रे.

 

कारवाईची प्रगती..

  • १ जून २०१६ : तावडे याच्या पनवेल येथील घरावर सीबीआयचा छापा. सनातन आश्रमातही झडती. संशयित सारंग अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा.
  • १० जून २०१६ : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात तावडेला अटक. कसून चौकशी. ईमेलद्वारे तो अकोलकरच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न.
  • ७ सप्टेंबर २०१६ : तावडे आणि अन्य दोघांवर आरोपपत्र दाखल.

 

हत्येमागचा हेतू..

डॉ. दाभोलकर हिंदू धर्मातील प्रथांविरुद्ध बोलतात. तसेच संतांबद्दल अवमानकारक उद्गार काढतात. चमत्कारांना आव्हान देतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:23 am

Web Title: cbi names virendra tawde as key conspirator in narendra dabholkar murder
Next Stories
1 अ‍ॅट्रॉसिटी कायदाच रद्द करा-उदयनराजे
2 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ अपघात, २ ठार, ४ जखमी
3 मुख्यमंत्र्यांची पत्नी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये शो-स्टॉपर
Just Now!
X