महाविकास आघाडीतील नेते विरुद्ध भाजपा नेते असा राजकीय आरोपप्रत्यारोपांचा कलगीतुरा राज्यात सुरू आहे. राजकीय नेते विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झडली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी चिमटा काढला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांचं शिक्षण यासाठी महात्मा फुले यांनी आयुष्यभर काम केले आहे. मात्र आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले,”संजय राऊत यांच्या प्रतिभेपुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार?,” असा टोला त्यांनी लगावला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले,”त्या स्वप्नात आहेत का?,” अशी टीका पाटील यांनी केली.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना पाटील म्हणाले, “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही,” असं पाटील म्हणाले.