राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (३१ मे रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मुंबई येथील सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी ही भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याच भेटीबद्दल खुलासा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस शरद पवारांना का भेटले याची माहिती पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त पाटील हे पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंडेच्या कार्यासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्याबद्दल चौकशी करण्यासाठी फडणवीस गेले होते, असं पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलातना पाटील यांनी, त्यानंतर (फडणवीसांनी) रक्षा खडसेंची भेट देखील घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं, ही आपली संस्कृती आहे. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. जर संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असं सांगितलं.

मुंडेंनी कार्यालयातील पार्टी रस्त्यावर आणली

३ जून २०१४ रोजी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना. गोपीनाथराव मुंडे यांच निधन झाले. आज सात वर्षे झाली त्या घटनेला. त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक विशेष पोस्ट एनव्हलप प्रकाशित करत आहे. सतत संघर्ष हे गोपीनाथ मुंडेंचं ध्येय होते. कार्यालयातील भारतीय जनता पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. गोपीनाथराव यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये पाटील यांनी मुडेंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणाचा निकाल वाचला त्यात…

भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर टीका केल्यासंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. “शरद पवार हे सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी चर्चा करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवतंय की, चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही,” असं पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना म्हटलं.