ममता बॅनर्जीच्या अभिनंदनाची प्रतिक्रिया

पुणे : ‘जामिनावर सुटला आहात, निर्दोष नाही. जोरात बोलू नका, महागांत पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पुद्दुचेरी, आसाम निवडणुकीबाबत बोला’, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रविवारी धमकीवजा इशारा दिला.

पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन के ले होते. ‘मेरा बंगाल नही दूंगी, या इष्र्येने त्या निवडणूक लढल्या आणि निवडणुकीची लढाई जिंकली’, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्याबाबत विचारणा के ली असताना  चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिला.

भुजबळांनी पंढरपूर निकालावर प्रतिक्रिया द्यावी. बंगाल कशाला, पुद्दुचेरी, आसामबाबतही त्यांनी बोलावे. जामिनावर सुटला आहात, निर्दोष नाही. जोरात बोलू नका. महागात पडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारविरोधातील संताप पंढरपूर निकालातून व्यक्त झाला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. आसाममध्ये भाजप सत्ता राखत आहे. पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला गेल्या वेळच्या तीन जागांच्या तुलनेत मोठे यश मिळाले आहे. देशामध्ये भाजप प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजप विरोधात इतर सर्व पक्षांना एकत्रित यावे लागते, हे या निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे, असे पाटील यांनी सांगितले.