राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने गारठय़ात वाढ झाली आहे. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीच्या खाली घसरल्याने दिवसाही हवेत गारवा आहे. कोरडय़ा हवामानामुळे आणखी दोन दिवस गुलाबी थंडी जाणवेल, असा अंदाज आहे.

गेल्या आठवडय़ापासून थंडी पडल्याने तापमान घटले असून तीन ते चार दिवसांपासून राज्य गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. थंडी असली तरी विदर्भासह इतर ठिकाणी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी विदर्भात थंडीची लाट पसरली आणि त्यानंतर गारपीट झाली. त्यानंतर पुन्हा सर्वत्र कोरडे हवामान तयार झाले आहे. त्यामुळे किमान तापमानात घट नोंदविली जात आहे. राज्यात ७ आणि ८ जानेवारीला मात्र अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी किमान तापमानात काहीशी वाढ होऊ शकेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.  रविवारी राज्यातील सर्वात कमी तापमान अकोला येथे १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कोकण विभागातील मुंबईत १९ अंश तापमान नोंदवले गेले. ते सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने हवेत गारवा आहे. रत्नागिरीतील तापमानही सरासरीपेक्षा २.१ अंशांनी कमी झाल्याने थंडी अवतरली आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ११.७ अंश, नाशिक येथे १०.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर आणि जळगावमध्ये किमान तापमान सरासरीखाली आले आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीखाली आल्याने गारठा वाढला आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. १० ते १२ अंशांवर किमान तापमान असल्याने या भागात थंडी कायम आहे.