कृषी तंत्रज्ञान महोत्सवात कृषी विद्यापीठ कुलगुरूंची ग्वाही

पुणे शहराच्या स्वच्छतेतून समृद्धीकडे ही संकल्पना साकार करण्यासाठी घनकचऱ्यापासून खतनिर्मिती हा पथदर्शक प्रकल्प कृषी महाविद्यालयात सुरू करण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पुणे महापालिकेला सहकार्य करू, अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी दिली आहे.

कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, आमदार विजय काळे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ आदी या वेळी उपस्थित होते.

विश्वनाथ म्हणाले,की कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प गणेशखिंड येथील कृषी महाविद्यात सुरू करण्यासाठी महापालिकेला सहकार्य केले जाईल. कृषी विद्यापीठांतर्गत सुरू असलेले संशोधन कार्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महोत्सवानिमित्त सादर केलेली पीक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना आणखी तीन दिवस पाहता येतील.

कृषी महोत्सवात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध पिकांची पीक प्रात्यक्षिके व कृषी सिंचन प्रणाली, सुधारित पशुधन, अळींबी लागवड तंत्रज्ञान, जीवाणू खते, जैविक कीड नियंत्रण, कृषी यंत्रे व अवजारे आदी तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे. धोत्रे, बापट यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रमोद रसाळ यांनी, सूत्रसंचालन डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी, तर आभार प्रदर्शन जयवंत जाधव यांनी केले.