बस आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच पादचाऱ्यांना तसेच सायकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मेट्रो सोयीस्कर ठरावी यासाठी मेट्रो प्रकल्पात सर्व वाहतूक यंत्रणांचा समन्वय राखण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांना मेट्रो स्थानक जोडण्यासंदर्भातील करारावर सध्या चर्चा सुरु असून पीएमपी तसेच एसटी स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानक जवळ पडावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकांचे काम महामेट्रोकडून सुरु झाले आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी मेट्रो प्रकल्पाची प्रगती, रेल्वे, एसटी, पीएमपी या दरम्यान होणारा ट्रान्सपोर्ट हब आदी विषयांची माहिती दिली.

‘रेल्वे स्थानकांना मेट्रो स्थानक जोडण्यासाठीच्या करारावर सध्या चर्चा सुरु आहे. यात प्रामुख्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उतरून मेट्रो स्थानकात प्रवेश करताना तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. विविध वाहतूक सेवा एकमेकांना जोडण्यासाठी नागपूरप्रमाणेच पुण्यातही प्रवाशांसाठी ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ (मी कार्ड) सुरु करता येईल का, याचा विचार सुरु आहे. एकच कार्ड प्रवासाबरोबरच वाहनतळांवर तसेच खरेदीसाठी वापरता यावे, अशी त्याची संकल्पना आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असेल्या ४४ हेक्टर जागेपैकी ३२ हेक्टर जागा शासकीय आहे. या सरकारी जमिनीपैकी १६ हेक्टर जागा महामेट्रोला मिळाली आहे,’ असे दीक्षित यांनी सांगितले.

विविध वाहतूक यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गिकेवर भोसरी मेट्रो स्थानक हे कासारवाडी रेल्वे स्थानकाला आणि त्याच भागातील बीआरटी बस थांब्याला जोडले जाईल. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बहुमजली वाहनतळाशी स्थानक जोडले जाईल. संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक हे एसटी स्थानक, खडकी मेट्रो स्थानकाला तसेच खडकी रेल्वे स्थानकाला जोडण्याचा विचार आहे. याच भागात बीआरटीचा थांबाही प्रस्तावित आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानक जवळ पडणार आहे. शिवाजीनगर भुयारी मेट्रो स्थानक हे शिवाजीनगर स्थानक आणि पीएमपी बस यंत्रणेला जोडण्यात येईल. पादचारी पुलाद्वारे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाशी जोडणी करण्यात येईल. वनाज ते रामवाडी मार्गिकेवर पुणे रेल्वे मेट्रो स्थानक हे पुणे रेल्वे जंक्शन आणि पीएमपी बस थांब्याला जोडण्यात येईल. तसेच येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी या मेट्रो स्थानकांचा बीआरटी थांब्याशी समन्वय साधला जाईल. शिवाजीनगर न्यायालयाजवळील मेट्रो स्थानक हे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांसह पीएमआरडीए मेट्रो मार्गिकेसाठीही इंटरचेंज स्थानक आहे. हे इंटरचेंज स्थानक पीएमपी बस थांब्याला जोडण्याचे नियोजन आहे. स्वारगेट भुयारी मेट्रो स्थानक हे स्वारगेट एसटी स्थानक आणि पीएमपी बस थांब्यास जोडण्यात येणार असून याठिकाणी सार्वजनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.

स्वारगेट परिसरात ट्रान्सपोर्ट हब

स्वारगेट-पिंपरी या मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट परिसरातील जेधे चौकात भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम प्रस्तावित आहे. महामेट्रोकडून हे काम होणार असून या ट्रान्सपोर्ट हबचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. एकात्मिक वाहतूक आराखडय़ा अंतर्गत हे काम होणार असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महापालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) या संस्था मिळून ते करणार आहेत. पीएमपी, एसटी आणि मेट्रो यांचे एकत्रित ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे.