पर्यावरण आणि युवक महोत्सवाच्या नावाखाली महापालिकेची लाखो रुपयांची लूट होत असल्याचे प्रकरण बाहेर येताच संबंधितांनी या महोत्सवांची बिले तब्बल चौपटीने कमी करून महापालिकेला सादर केली आहेत. मूळच्या ४८ लाख रुपयांऐवजी आता १२ लाखांची बिले महापालिकेला देण्यात आली आहेत. या प्रकारामुळे अधिकारी, ठेकेदार आणि काही पुढारी यांचे या लुटीमध्ये संगनमत होते, हेही स्पष्ट झाले आहे.
महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या दोन महोत्सवांतून लाखो रुपयांचे खोटे खर्च दाखवण्यात आले होते तसेच जे कार्यक्रम महोत्सवांमध्येच झालेच नाहीत आणि जे अगदीच किरकोळ स्वरूपाचे झाले, त्या कार्यक्रमांवरही लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला होता. पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी या प्रकाराच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर महापौर वैशाली बनकर यांनी असा काहीही प्रकार झालेला नाही, महोत्सवांना चांगला प्रतिसाद मिळाला, सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले, असे सांगत अधिकारी व ठेकेदाराची पाठराखण केली होती. मात्र, खर्चाचे आकडे खोटे असल्याचे व या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसल्यामुळे खुद्द राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काँग्रेसनेही महोत्सवाचे धनादेश ठेकेदाराला देऊ नयेत, अशी मागणी आयुक्तांकडे केली.
या महोत्सवांसाठी सुरुवातीला ४८ लाख रुपये खर्च होणार होते. मात्र, स्वयंसेवी संस्थांकडून ओरड व तक्रारी झाल्यानंतर तसेच थेट महापौरांवरच आरोप झाल्यानंतर आता सुधारित बिले सादर करण्यात आली आहेत. या सुधारित बिलांमुळे मूळची बिले तब्बल वीस-वीस पटींनी फुगवलेली होती, हेही उघड झाले आहे. नव्याने दिलेली बिले देखील फुगवलेली असून त्यातही अनेक गडबडी असल्याचे सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी मंगळवारी सांगितले.
मुळातच, या महोत्सवांच्या निविदा प्रक्रियेतच गडबडी झालेल्या होत्या. निविदाही संगनमताने भरण्यात आल्या होत्या आणि नव्याने सादर केलेल्या बिलांमध्येही एकेका बाबीवर तीन-तीन ठिकाणी खर्च दाखवण्यात आला आहे. या सर्व प्रकारात अधिकाऱ्यांबरोबर असलेले ठेकेदारांचे संगनमत दिसत असून, कागदपत्रेही खोटी आहेत, अशी तक्रार कुंभार आणि विवेक वेलणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.