पाच केंद्रे कार्यान्वित करण्याचा मानस

पुणे : शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत दोन लाख २८ हजार नागरिक उपचारांनंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या नागरिकांना मानसिक, सामाजिक, औषधांचे दुष्परिणाम अशा विविध समस्या येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या नागरिकांना डॉक्टरांचे मार्गदर्शन, समुपदेशन करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून पाच के ंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

करोनानंतरचा व्यवस्थापन आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. याबाबत गेल्या आठवडय़ात अभ्यास करण्यात आला आहे. याबाबत मुंबईत नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे पथक पाठवून माहिती घेण्यात आली. तसेच ओडिशा राज्यातील कटक विद्यापीठामध्ये ‘करोनानंतरचे व्यवस्थापन’ या विषयावर अभ्यास करण्यात आला आहे. ती माहिती विद्यापीठाकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही पाच के ंद्रे म्हणजेच बाह्य़ रुग्ण विभाग कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्य़ात आतापर्यंत दोन लाख २८ हजार जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. मात्र, यापैकी दहा ते बारा टक्के  जणांना मानसिक, सामाजिक समस्या जाणवत आहेत. काही जणांना मेंदूशी निगडित समस्या असून काहींना औषधांचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. तसेच काही जणांना शारीरिक दोषांवर उपचारांची (फिजिओथेरपी) गरज आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), पिंपरीतील अण्णासाहेब मगर क्रीडांगण ही दोन्ही मोठी करोना काळजी केंद्रे, ससून व नायडू रुग्णालय आणि बाणेर येथील करोना के ंद्र अशा पाच ठिकाणी करोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी बाह्य़ रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

टोल फ्री क्रमांकाची सुविधा

करोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्रशासनाने तयार के लेल्या पाच केंद्रांमध्ये प्रत्यक्ष जाता येईल. ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, अशांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पथके  नेमण्यात येणार आहेत. बरे झालेल्या रुग्णांशी मानवी दृष्टिकोनातून संवाद साधण्यात येणार आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. यापैकी काही जणांना पुन्हा उपचारांची गरज असल्यास तेही उपलब्ध करुन दिले जातील, असेही राव यांनी सांगितले.