हिंजवडीतील एका गृहप्रकल्पात सदनिका खरेदी व्यवहाराचे पैसे देऊनही ताबा न दिल्याप्रकरणी रिव्हर व्हय़ू प्रॉपर्टीज या बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनीच्या संचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट (मोफा) कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रिव्हर व्ह्य़ू प्रॉपर्टीजच्या संचालकांसह दीपक बोरकर यांच्याविरूद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता अश्विन गोंडाने (वय ३५, सध्या रा. हडपसर, मूळ रा. भंडारा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट येथे कुमार कॅपिटल या इमारतीत रिव्हर व्ह्य़ू प्रॉपर्टीजचे कार्यालय आहे. गोंडाने एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहे. िहजवडी भागातील म्हाळुंगे येथे रिव्हर व्ह्य़ू प्रॉपर्टीजकडून कुल इकोलॉक वन गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. या प्रकल्पात सातशे सदनिका आहेत. त्यापैकी काही सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे. गोंडाने यांनी सदनिका खरेदीच्या व्यवहारापोटी ३८ लाख ९६ हजार ५७४ रुपये अदा केले होते. मात्र, त्यांना बांधकाम कंपनीने करारात नमूद केलेल्या दर्जाचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण केले नाही, तसेच गोंडाने यांना सदानिकेचा ताबाही दिला नाही, असे गोंडाने यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रिव्हर व्ह्य़ू प्रॉपर्टीजने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही, तसेच माझ्यासह आणखी काही सदानिका धारकांची फसवणूक केली आहे, असे गोंडाने यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे तपास करत आहेत.