पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्यातल्या विविध भागांमधले नागरिक १ जानेवारी रोजी येत असतात. यंदाचे या शौर्य स्तंभाचे २०० वे वर्ष आहे. त्यामुळे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते. मात्र सकाळी अचानक गोंधळ झाला. ज्यानंतर भीमा कोरेगाव परिसरातली काही भागात दुकानांवर दगडफेक झाल्याचे समजते आहे. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिरूर आणि हवेली परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा आदेश दिला आहे

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाजवळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा तणाव नेमक्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाला हे अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र संतापलेल्या नागरिकांनी दुकाने आणि पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडल्याचे कळते आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी संचारबंदी करण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या शिरूर आणि हवेली भागात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच या ठिकाणी कोणताही तोडफोडीचा किंवा इतर प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

पोलीसांनी या मार्गावर जाणाऱ्या खासगी आणि सरकारी सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरुवात केलीय. लोकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.