दहीहंडीची उत्सव मंडळांकडून जागोजागी फलकबाजी; महापालिकेकडून काणाडोळा
दहीहंडी आठवडय़ाभरावर येऊन ठेपली आहे. दहीहंडीपूर्वीच गेल्या आठवडय़ापासून शहरातील वेगवेगळय़ा भागात दहीहंडी संयोजकांकडून फलक (फ्लेक्स) लावण्यात आले आहेत. दहीहंडीच्या शुभेच्छा, तरुणाईला खेचण्यासाठी अभिनेते-अभिनेत्रींची उपस्थिती, अशा फ्लेक्सबाजीने शहरातील महत्त्वाच्या चौकांतील कोपरे व्यापून टाकले आहेत. शहर विद्रूपीकरणाचा धडका फ्लेक्सबाजीतून लावणाऱ्या संयोजकांवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे काणाडोळा करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात दहीहंडी साजरे करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गणेशोत्सवापूर्वी असलेल्या एकदिवसीय दहीहंडीच्या उत्सवासाठी लाखो रुपयांची वर्गणी गोळा केली जाते. सार्वजनिक मंडळे आणि तरुणांच्या काही गटांकडून (ग्रुप) दहीहंडी साजरी केली जाते. गणेशोत्सवाप्रमाणे दहीहंडीचा सण साजरा करण्याची चढाओढ गेल्या काही वर्षांपासून लागली आहे. शहर तसेच उपनगरातील सर्व भागांत दहीहंडीचा सण साजरा करणाऱ्या मंडळांनी आठवडाभरापासून शुभेच्छा देणारे फलक महत्त्वाच्या चौकांत लावले होते. चौकांतील कानाकोपरा दहीहंडीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांनी व्यापले आहेत. फलकांमुळे शहर विद्रूप झाले आहे. शहराच्या वेगवेगळय़ा भागांत लावण्यात आलेल्यांना फलकांना महापालिकेची परवानगीदेखील नाही. चौकाचौकांत करण्यात आलेल्या फ्लेक्सबाजीकडे महापालिका तसेच पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
दहीहंडी साजरी करण्याचे प्रमाण शहराच्या मध्यभागात मोठे आहे. सिंहगड रस्ता, विमाननगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, वडगाव शेरी, हडपसर, कोंढवा, कात्रज-धनकवडी या उपनगरांमध्ये दहीहंडी साजरी करण्याचे प्रस्थ वाढले आहे. दहीहंडीच्या एका दिवसाच्या उत्सवासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची स्पर्धा वाढीस लागली आहे. परिसरातील व्यापारी, फेरीवाल्यांकडून दहीहंडीची वर्गणी गोळा केली जाते. वर्गणीसाठी काही व्यापाऱ्यांना धमकावले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
दहीहंडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
दहीहंडीच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळय़ा भागांत अनेक नगरसेवक, राजकीय नेते शक्तिप्रदर्शन करतात. राजकीय पाठबळ असणाऱ्या दहीहंडीच्या संयोजकावर कारवाई केली तर वाद होतो. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकांसंदर्भात काही निर्देश दिले आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी असते. ध्वनिवर्धक बंद करण्याची सूचना केल्यानंतर दरवर्षी मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी होते. राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा येते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
वर्गणीसाठी धमकावले; खंडणीचा गुन्हा
दहीहंडीच्या वर्गणीसाठी व्यापाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी एकाला हडपसर पोलिसांकडून नुकतीच अटक करण्यात आली. या प्रकरणी विशाल मिरेकर (रा. गाडीतळ, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर भागातील व्यावसायिकांना दहीहंडीच्या वर्गणीसाठी काही जण धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मिरेकरला अटक केली होती.