मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीनंतर अकरावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया गेला महिनाभर रखडली आहे. आरक्षणावर प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने प्रवेशांचे काय होणार या संभ्रमात पालक आणि विद्यार्थी असून, प्रवेश प्रक्रियांबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात येत आहे.

राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी १० सप्टेंबरला, तर आयटीआय प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी १४ सप्टेंबरनंतर जाहीर होणार होती. मात्र, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे अकरावी आणि आयटीआयची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतरच्या महिनाभर राज्य शासनाकडून आरक्षणाबाबत पुढील प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात तांत्रिक अडचणी आहेत. प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाकडून निर्देश येणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतर आणि बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रक्रियाही रेंगाळत सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेत पहिली गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर आरक्षणाच्या पेचामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नसल्याने पदविका अभ्यासक्रमांना डीटीईकडून मुदतवाढ दिली जात आहे. प्रवेश प्रक्रियेला आतापर्यंत सात वेळेस मुदतवाढ मिळाली आहे.