सुमित्रा भावे (प्रसिद्ध दिग्दर्शिका)

आमच्या घरामध्ये माझे बाबा म्हणजे केशव गणेश उमराणी हे इंग्रजी साहित्याचा अभ्यास करीत असल्याने पुस्तकांचा मोठा संग्रह होता. आई तशी जेमतेम शिकलेली. परंतु बाबांनी आईला, मला व माझ्या बहिणीला वाचनाची आवड लावली आणि घरामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रंथालय तयार केले. घरातील प्रत्येकाचे वेगळे ग्रंथालय असल्याने प्रत्येकाची वाचनाची आवडही वेगवेगळी. इतर वस्तूंपेक्षा पुस्तकांना जास्त जागा आम्ही द्यायचो. त्यामुळे सात फुटी लाकडी कपाटांमध्ये प्रचंड प्रमाणात पुस्तकांचा संग्रह केलेला असायचा. दरवर्षी ज्या लेखकाला नोबेल पुरस्कार असायचा, त्याची पुस्तके आमच्या घरामध्ये हमखास आणली जात. बाबांनी आईलाही वाचनाची आवड लावल्याने भा. रा. तांबे, ना. घ. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्या कवितांची पुस्तके आईच्या ग्रंथालयात होती. वेगवेगळ्या मराठी, इंग्रजी पुस्तकांसह कवितांची पुस्तके वाचता वाचता माझा वाचनाचा छंद वृद्धिंगत होत गेला.

शाळेत असताना पाठय़पुस्तकांतील महात्मा गांधी, कार्ल मार्क्‍स यांचे धडे वाचण्यासोबतच, त्यांच्याविषयीची इतर पुस्तकेही वाचायची, असा बाबांचा आग्रह असायचा. त्यामुळे महात्मा गांधी, विनोबा भावे यांसारख्या राष्ट्रपुरुषांची चरित्रे शालेय जीवनातच वाचण्याची संधी मला मिळाली. एक जण आमच्या सोमवार पेठेतील घरी पुस्तके विकायला येत असत. त्यांना बाबा कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हते. घरी आले की त्यांना जेवायला बसवायचे आणि त्यानंतर मनसोक्त पुस्तकांची खरेदी करुन योग्य मोबदला देत त्यांना निरोप देत असत. बाबांचे पुस्तकप्रेम आणि पुस्तके विकणाऱ्या व्यक्तीबद्दलचा आदर पाहून आम्ही भारावून जात असू. ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ पुस्तकातील चित्रे दाखवून बाबा गोष्ट सांगायचे. त्यामुळे चित्रांची पुस्तके जमवायची आवड मला तेव्हापासून लागली. आजही माझ्या संग्रहात अशी अनेक चित्रांची पुस्तके आहेत. लहानपणी माझे टॉन्सिल्सचे ऑपरेशन झाले होते. काही दिवस मला बोलता येत नव्हते; तेव्हा बाबांनी मला भा. रा. भागवत, साने गुरुजी आणि रॉबिनहूडची पुस्तके आणून दिली. ‘चांगली संधी आहे वाचन कर,’ असे सांगितले. त्यामुळे वाचनासाठी मिळेल ती संधी शोधायची सवय मलाही लागली.

इंग्रजी नाटके म्हणजे बाबांचे जीव की प्राण. त्यामुळे घरामध्ये शेक्सपियर, जॉर्ज बर्नाड शॉ यांसारख्या लेखकांची पुस्तके तर होतीच; त्याचसोबत जपानी, चिनी, रशियन आणि फ्रेंच लेखकांची इंग्रजीमधील अनुवादित पुस्तकेही असायची. जागतिक साहित्यासोबतच संग्रहित असलेल्या आध्यात्मिक पुस्तकांमध्ये कालिदास नाटिका, ‘रघुवंश’ ही पुस्तके मी महाविद्यालयामध्ये संदर्भग्रंथ म्हणून वाचली होती. आमच्या कुटुंबाला वाचनाची एवढी आवड होती, की बाबांनी मुंबईहून स्वयंपाकाच्या आणलेल्या पुस्तकांवरुन वाईन मेकिंगची रेसिपी वाचत घरी वाईनदेखील तयार केली. ह. ना. आपटे, दि. बा. मोकाशी, श्रीनिवास कुलकर्णी, मििलद बोकील, गौरी देशपांडे यांच्यासह इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांची वैचारिक पुस्तकेही वाचली. फग्र्युसन महाविद्यालयात असताना साहित्य सहकार मंडळाच्या माध्यमातून कविसंमेलनात सहभाग, दर आठवडयाला वाङ्मयीन चर्चा असे कार्यक्रम आम्ही राबवित असू आणि उत्साहाने सहभागदेखील घेत होतो. या माध्यमातून भरविलेल्या संमेलनांमध्ये नामवंत साहित्यिकांना भेटण्याचा योगही आला.

माझी कवितांविषयीची आवड ओळखून प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये, अनुराधा पोतदार, पद्मा गोळे, आनंद यादव, अशोक केळकर असे दिग्गज एकत्र येत असलेल्या ‘पोएट्री क्लब’मध्ये मलाही समाविष्ट करून घेतले गेले. आम्ही दर महिन्याला कोणा एकाच्या घरी जमत असू. त्यामध्ये एकाने कविता वाचायची आणि काय वाटले हे सांगायचे. त्या क्लबमध्ये सगळ्यात वयाने लहान असलेली मीच होते. परंतु वयातील हा फरक हा दिग्गजांनी मला कधीही जाणवू दिला नाही. साहित्य आणि चित्रपट या जवळच्या कला आहेत, हे िवदा करंदीकर यांचे वाक्य चित्रपट निर्मितीच्यावेळी मला नेहमी आठवायचे. त्यामुळे चित्रीकरणाला जाताना पुस्तकांची पिशवी सोबत घेऊनच मी जाते. चित्रपटांच्यानिमित्ताने अमेरिका, जपान येथे जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे तेथील लेखकांची आणि चित्रपटाविषयाची पुस्तके मी संग्रहित केली.

विमानप्रवास करताना अनेकदा मोबाईल, किंडल्सवरही पुस्तके वाचली. परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तके वाचण्याची मजा काही वेगळीच आहे. मुंबईमध्ये जाऊन रविवारी निवांतपणे पुस्तके खरेदी करणे, हे नित्याचेच. दिल्ली दूरदर्शनकरिता काही वर्षांपूर्वी आम्ही कथेचे कार्यक्रम केले. त्यामध्ये सुधा मूर्ती, अनंत मूर्ती यांचा सहभाग होता. तर, सहयाद्री मराठी वाहिनीसाठी कमल पाध्ये, ह. मो. मराठे, विजया राजाध्यक्ष अशा नामवंतांच्या कथांचे १३ भाग केले. यानिमित्ताने लेखक आणि पुस्तकांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. बाबांप्रमाणेच माझा संग्रह वाढत होता. आपल्या संग्रहातील ही पुस्तके इतरांना उपयोगी पडावीत, हा विचार मनात आला. आमच्या सोसायटीच्या ग्रंथालयाला त्यातील काही पुस्तके भेट दिली. बाबांनी लावलेली वाचनाची आवड त्यांच्या नातीला लागली नाही तरच नवल. माझ्या संग्रहातील काही पुस्तके आणि माझ्या मुलीने संग्रहित केलेल्या पुस्तकांचा आजच्या तरुणाईला उपयोग व्हावा म्हणून तिने अनोखी संकल्पना मांडली. त्यात मीही उत्साहाने सहभाग घेतला, तो माझ्या वाचनप्रेमामुळे. वारी-बुक कॅफे नावाची ही संकल्पना. कर्वेनगर भागात करिश्मा सोसायटी चौकाजवळ असलेले हे कॅफे वाचनवेडय़ांसाठी आहे. कोणीही या खुल्या शेल्फमधून पुस्तके घ्या आणि मनसोक्त वाचन करा, हीच त्यामागची संकल्पना. नाटक, कथा, कादंबऱ्या असे वेगवेगळे साहित्य वाचून पुस्तकांची वारी घडविण्याचा हा छोटासा प्रयत्न.