आरक्षित भूखंडावर बेकायदा बंगला बांधल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अपात्र ठरवत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. देशमुख यांनी लोकमंगल समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचीही फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

ज्या पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्यात येते. तशाच पद्धतीने सुभाष देशमुख यांना अपात्र ठरवण्यात यावे. त्यांना अपात्र ठरवून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी. यापूर्वी वृत्तपत्रातून देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही सर्वसामान्यांची फसवणूक आहे. त्याचबरोबर भागधारकांचे पैसे वापरून स्वत:साठी जमिनी खरेदी केल्या. सेबीनेही त्यांना टोकले. आता तर त्यांचा बंगलाच अनाधिकृत असल्याची टीका त्यांनी केली. बारामती येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान, सोलापुरात आरक्षित भूखंडावर केलेले आलिशान बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर महापालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयास सादर केला, यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.