‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास वर्षांनंतरही का लागला नाही, याबाबत पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कायदेशीरदृष्टय़ा हे पोलिसांचे अपयश आहेच, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी आहेत. नियोजनबद्ध आणि व्यावसायिक गुन्हेगारांनी केलेले काही गुन्हे उघड व्हायला वेळ लागतो किंवा ते उघड होतही नाहीत. जगातही अशी उदाहरणे आहेत.’’
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर सांगत होते. डॉ. दाभोलकर खुनाच्या गुन्ह्य़ाची उकल झालेली नाही. या निमित्ताने एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास लागला नाही, तर ते निव्वळ पोलिसांचे अपयश असते की इतरही घटक त्याला कारणीभूत असतात, याबाबत उमराणीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की गुन्हा उघड होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. ते पोलिसांचे अपयश ठरतेच. काही गुन्हे खूप नियोजनबद्ध असतात. ते व्यावसायिक गुन्हेगारांकडून घडवून आणले जातात. अशा वेळी तपास लागणे कठीण बनते. मात्र, नंतर चाम्स डिटेक्शन होऊ शकते. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा गुन्हा नियोजनबद्ध आहे हे नक्की. डॉक्टरांच्या कार्यामुळे अनेक लोक दुखावले गेले होते. त्यामुळे यामागे कोण असावे हे सांगणे कठीण आहे. त्यांचे नातलग, ओळखीचे लोक यांनी दिलेले सर्व धागेदोरे पोलिसांनी तपासले आहेत. पण कोणाच्याही विरोधात पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत.
‘लोकही पुढे आले नाहीत’
सकाळी घडलेल्या या गुन्ह्य़ाची माहिती काही लोकांना असू शकते. पण या गुन्ह्य़ाबाबत काही ठोस माहिती असलेले लोक पुढे आले नाहीत. या गुन्ह्य़ाबाबत समाजातील कोणालाच काही माहीत नसेल असे मानणे कठीण आहे, असे उमराणीकर म्हणाले.
काही गुन्ह्य़ांची उकल होत नाही. जगातही अशी उदाहरणे आहेत. स्वीडनचे पंतप्रधान ओलासपालमे यांचा भरदिवसा रस्त्यात खून झाला. पण आता चाळीस वर्षांनंतरही त्याचा उलगडा झालेला नाही. पुण्यात पूर्वी उकल न होता गुन्हे राहत नव्हते. गेल्या काही वर्षांत अलूरकर आणि सतीश शेट्टी यांच्या खुनाचे गुन्हे उघड झालेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
‘सीबीआयकडून तपासामध्ये गती नाही’
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे जाऊन तीन महिने झाले आहेत. तरीही तपासामध्ये गती आलेली दिसून येत नाही. या प्रकरणी सीबीआयने तपास करून लवकरात लवकर निष्कर्षांपर्यंत पोहोचावे. तपासात जाणीवपूर्णक दुर्लक्ष होत आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात आता येऊ लागली आहे. असे जरी असले तरी चळवळ थांबलेली नाही. अंनिसचे कार्यकर्ते दुप्पट जोमाने काम करीत आहेत. शासनाने मारेकऱ्यांचा आणि सूत्रधारांचा लवकरात लवकर शोध लावून त्यांना शासन करावे, अशी आमची मागणी आहे. त्याबरोबरच प्लॅन्चेट सारख्या कृत्याचा मारेकरी पकडण्यासाठी वापर झाल्याचे आरोप झाले आहेत. त्या बाबतीमधील सत्य शासनाने जनतेसमोर आणलेले नाही. त्याचा देखील राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये निषेध मोर्च काढून अंनिसचे कार्यकर्ते धिक्कार करणार आहेत.
– डॉ. हमीद दाभोलकर