पुणे, पिंपरीत १४ मार्गावर धावणार; ‘आरटीओ’कडून प्रक्रिया सुरू

बॅटरीवर चालणाऱ्या प्रदूषणमुक्त ई-रिक्षांचा शहरात धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. वाहतूक विभागाकडून या रिक्षांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १४ मार्ग सुचविण्यात आले आहेत. ही रिक्षा चालविण्यासाठी चालकाला स्वतंत्र परवाना काढणे आवश्यक आहे. ट्रान्सपोर्टच्या धर्तीवर हा परवाना असला, तरी त्या बाबत विविध अटी शिथिल करण्यात आल्या असून, ई-रिक्षांची सुविधा करमुक्त करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या बाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी गुरुवारी या बाबतची माहिती दिली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पंतोजी तसेच ई-रिक्षाच्या निर्मात्या कंपन्यांचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. आजरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा चालविण्यासाठी स्वतंत्र परवाना काढावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा ट्रान्सपोर्ट परवाना असला, तरी त्यात चालकाला आठवी पास ही शिक्षणाची अट घालण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून संबंधित चालकाने प्रशिक्षण घेणे अपेक्षित नाही. ई-रिक्षा उत्पादक कंपन्यांकडून संबंधिताला प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर चालकाला ई-रिक्षा चालविण्याचा परवाना देण्यात येईल.

ई-रिक्षांना नियमानुसार तंदुरुस्ती चाचणी (फिटनेस) करावी लागेल. या सुविधेसाठी केंद्राच्या धोरणानुसार कराची आकारणी केली जाणार नाही. ई-रिक्षाचे भाडे परिवहन विभागाकडून ठरविण्यात येणार नाही. चालक आणि प्रवासी यांच्या समन्वयातून भाडय़ाची आकारणी केली जाईल. भाडय़ाबाबत नियंत्रण नसले, तरी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक, भाडे नाकारणे आदींबाबत मात्र कारवाई होऊ शकेल, असेही आजरी यांनी स्पष्ट केले.

तीन युनिट विजेमध्ये १०० किलोमीटर धाव

बॅटरीवर चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीची ई-रिक्षा आणि मालवाहतुकीचा टेम्पोही उत्पादक कंपन्यांनी तयार केला आहे. ही वाहने नागरिकांना आणि खरेदीदारांना पाहण्यासाठी २० ऑगस्टला पुणे आरटीओच्या आवारात ठेवण्यात येणार आहेत. उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षाचा वेग प्रतितास २५ किलोमीटर असेल. बॅटरी घरगुती प्लगद्वारेही चार्ज करता येणार आहे. सात ते आठ तास चार्जिग केल्यानंतर रिक्षा सुमारे ८० ते १०० किलोमीटर धावू शकेल. विशेष म्हणजे एका वेळच्या चार्जिगसाठी केवळ तीन युनिट वीज लागेल.

ई-रिक्षासाठी सुचविण्यात आलेले मार्ग

  • पद्मावती चौक ते बालाजीनगर चौक
  • पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक चौक
  • खडीमशीन चौक ते उंड्री चौक
  • विश्रांतवाडी चौक ते ५०९ चौक
  • गणपतीमाथा ते कोंढवे धावडे
  • धायरी फाटा चौक ते राजाराम पूल चौक
  • पाषाण-सूस रस्ता साई चौक ते सूस खिंडीपर्यंत
  • कमांड हॉस्पिटल रस्ता
  • बी. टी. कवडे रस्ता
  • वानवडी बाजार रस्ता
  • संभाजी चौक ते भक्ती-शक्ती चौक (निगडी)
  • सांगवी फाटा ते कस्पटे चौक
  • काळेवाडी फाटा ते पिंपरी
  • नाशिक फाटा ते कस्पटे चौक