शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आयुष मंत्रालयाने कोंबडी आणि अंड्याला शाकाहारी म्हणून घोषित करावे. तसेच कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा. अशी मागणी केली आहे. ती अतिशय चुकीची आहे. अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य आणि अवैज्ञानिक असल्याची भूमिका सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी मांडली.

यावेळी डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले की, ज्या पेशीला सेल मेम्ब्रेन असते, तो पदार्थ मांसाहारी असतो. ज्या पेशीला सेलवॉल असते तो शाकाहारी, अंड्याला सेल मेम्ब्रेन आहे. त्यामुळे ते मांसाहारी असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, अंड्याची तुलना स्त्रीच्या राजोधर्माशी करता येईल. अंडी ही गर्भरज आणि योनीजन्य पदार्थ आहे. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत एक स्त्रीबीज बाहेर पडत असते. तसेच, कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेत कोंबडीचे स्त्रीबीज अंड्याच्या रूपाने बाहेर पडते. ज्यांना नराचा संकर झाला नाही. त्या अफलित अंड्याना शाकाहारी म्हणणे अवैज्ञानिक आहे. अफलित अंड्यातदेखील जिवंत स्त्रीबीज असते. त्यामुळे त्याला शाकाहारी म्हणणे चुकीचे आहे. अशा स्वरूपाचा निष्कर्ष शास्त्रज्ञ पीटर रॉम्पकीन्स क्रिस्तोर यांच्या ‘द सिक्रेट लाईफ ऑफ प्लॉट्स’ या पुस्तकात केला आहे.

त्यामुळे अंड्याला शाकाहारी ठरवण्यामागे आर्थिक राजकारण आणि खेळी आहे. आम्ही शाकाहाराचे समर्थन करणाऱ्या सर्व संघटना याला एकत्रित येत खासदार संजय राऊत यांच्या मागणीचा विरोध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.