अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत आता तीनही फे ऱ्यांमध्ये वरचे महाविद्यालय मिळवण्याची संधी मिळण्याबरोबरच त्यांचे शुल्कही सुरक्षित राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी होण्यापूर्वी कोणत्याही महाविद्यालयाला तात्पुरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही.

तात्पुरता प्रवेश घेऊन पुढील फेरीत चांगले महाविद्यालय मिळण्यासाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांंना महाविद्यालयांच्या मनमानीला सामोरे जावे लागत होते. मुळातच विद्यार्थ्यांच्या शोधात असलेली अभियांत्रिकी महाविद्यालये तात्पुरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही पूर्ण शुल्क घेत होती. त्यानंतर प्रवेश रद्द करण्याऱ्या विद्याथ्यार्ंची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारीही तंत्रशिक्षण विभागाकडे येत होत्या. आता या प्रकाराला आळा बसणार आहे.

केंद्रीय प्रवेश फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर तंत्रशिक्षण विभागाच्या नावाने शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर स्लाईच किंवा फ्लोट पर्याय वापरून पुढील फेरीत विद्यार्थी सहभागी झाला तरीही त्याचा प्रवेश आणि शुल्क दोन्ही सुरक्षित राहणार आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी ५ हजार रुपये, पदविका अभ्यासक्रमासाठी ३ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये शुल्क आहे. प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयांत पूर्ण शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे. त्या वेळी आधी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश निश्चित करण्यासाठी भरण्यात आलेले शुल्क एकूण शुल्कातून वजा करण्यात येईल.