राकट आणि कणखर महाराष्ट्रातील दुर्गाची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून करून देण्याचा उपक्रम यंदाही सुपर इंदिरानगरमध्ये झाला असून यंदा सोळा किल्ल्यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. त्या बरोबरच छत्रपती संभाजीमहाराजांची भव्य रंगावली हेही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिबवेवाडी नगरातील ओंकार शाखेच्या वतीने गेली चार वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. यंदा दोन ते तेवीस या वयोगटातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला असून सुवर्णदुर्ग, चावंड, हरिश्चंद्रगड, राजमाची, राजगड, विसापूर, शिवनेरी, रोहिडा, रतनगड, महिमानगड, कोरीगड, जीवधन, तोरणा, प्रतापगड, संग्रामदुर्ग या किल्ल्यांच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत. त्याबरोबरच  एक काल्पनिक किल्लाही तयार करण्यात आला आहे.
प्रेक्षकांना प्रत्येक किल्ल्याचे वर्णन व इतिहास सांगण्याचे काम पन्नास ते साठ बालांकडे सोपवण्यात आले आहे. संघातर्फे गेली चार वर्षे हा उपक्रम सुरू आहे. या भागातील नागरिक मोठय़ा संख्येने येऊन हे प्रदर्शन पाहात आहेत. सुपर इंदिरानगरमध्ये व्हीआयटी कॉलेजच्या मागे हे प्रदर्शन गेले चार दिवस सुरू असून बुधवार (६ नोव्हेंबर) हा शेवटचा दिवस आहे.