पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले असून यापासून सावध राहा असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कृष्ण प्रकाश नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते हे नाकारता येत नसल्याने त्याच्या पासून नागरिकांनी सावध राहावे अस लोकसत्ता ऑनलाईन शी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.
आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सूत्रे हातात घेतल्या पासून विविध कारवाई चा धडाका पोलीस अधिकाऱ्यांनी लावला आहे. ते आल्यापासून शहरातील अवैद्य धंद्यांवर जरब बसला असून त्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना त्यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या नावाने फेसबुकसह इतर काही बनावट खाते असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, बनावट फेसबुक प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले असून नागरिकांनी जागरूक राहावे असे आवाहन केले आहे.
बनावट फेसबुक बद्दल ची पोष्ट कृष्ण प्रकाश यांनी केली डिलिट!
बनावट फेसबुक प्रकरणी कृष्ण प्रकाश यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेजवर माहिती दिली होती. मात्र, एक तास झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही पोस्ट त्यांनी डिलीट का केली हे समजू शकले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 22, 2020 2:21 pm