News Flash

आंबा पिकविण्याच्या चुकीच्या पद्धतींबाबत अन्न व औषध विभाग जागरुकता करणार

कच्चे आंबे लवकर पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुकीच्या पद्धतींबाबत अन्न व औषध विभाग जागृती मोहिमेची आखणी करीत आहे.

| February 14, 2013 11:27 am

कच्चे आंबे लवकर पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुकीच्या पद्धतींबाबत अन्न व औषध विभाग जागृती मोहिमेची आखणी करीत आहे. आंब्यांचा मोसम सुरू झाल्यानंतर फळ पिकविण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरणाऱ्या विक्रेत्यांवर होऊ शकणाऱ्या कारवाईचा इशाराच ही मोहीम देणार आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
देसाई म्हणाले, ‘‘आंबे लवकर पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचे खडे किंवा पुडय़ा पेटीत ठेवल्या जातात. कॅल्शियम कार्बाइडपासून तयार होणाऱ्या अ‍ॅसिटिलिन वायूमुळे उष्णता निर्माण होऊन आंबे वरून लवकर पिकतात मात्र आतून कच्चे राहतात. कॅल्शियम कार्बाइडच्या वापरास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे त्याचा वापर बंद होऊन आंबा पिकविण्यासाठी इथिलिन गॅस चेंबरचा किंवा इतर नैसर्गिक उपायांचा वापर व्हावा यासाठी अन्न विभागातर्फे जनजागृती मोहिमेची आखणी सुरू आहे. आंबे बाजारात येण्यापूर्वी फेब्रुवारीच्या शेवटास मार्केट यार्डमधील आंबे विक्रेत्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.’’
‘अ‍ॅग्रो राईप’ या कंपनीचे सुनील भट या मोहिमेत अन्न विभागास सहकार्य करणार आहेत. भट म्हणाले, ‘‘कॅल्शियम कार्बाइडचा हवेतील आर्द्रतेशी संपर्क आल्यावर त्यापासून अ‍ॅसिटिलिन वायूबरोबरच आर्सेनिक आणि फॉस्फोरस हे विषारी वायूही बाहेर पडतात.
या वायूंचा फळांवर व आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. विशेषत: ही फळे पेटय़ांत भरणारे मजूर या विषारी वायूंच्या सतत संपर्कात येतात. त्यांना अ‍ॅलर्जी, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात. अ‍ॅसिटिलिन वायू स्फोटक आहे. आंबा पेटय़ांत भरताना विडी पेटवली तर स्फोट झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरास बंदी आहे. इथिलिन गॅस चेंबर हा फळे पिकविण्याचा चांगला मार्ग आहे. हा पर्याय कॅल्शियम कार्बाइडपेक्षा स्वस्त असतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 11:27 am

Web Title: fda will take action against those who will use wrong methods to make mango ready to eat
टॅग : Mango
Next Stories
1 ‘सार्क नॉलेज प्लॅटफॉम’ची स्थापना व्हावी – डॉ. कलाम
2 शहरात पंचेचाळीसपैकी सतरा रस्त्यांवर अतिक्रमण कारवाई
3 बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड घेतल्याचे उडकीस
Just Now!
X